मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

मुंबई–पुणे जुन्या महामार्गावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळली!

खोपोली पोलिसांच्या तात्परतेमुळे अनर्थ टळला

स्वतः हातात फावडे घेत रस्ता केला मोकळा

दरड कोसळताच मदतीला धावले खाकी वर्दीतील 'रक्षक'


​खोपोली-रायगड, दि. ८ (प्रतिनिधी) :- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात अचानक दरड कोसळल्याची घटना घडली. डोंगरावरून आलेला भलामोठा दगड-मातीचा ढिगारा थेट रस्त्याच्या मधोमध आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. तसेच घाटातील धोकादायक वळणावर हा राडारोडा पडल्याने अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी कसलाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.

​घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी यंत्रणेची वाट न पाहता स्वतःच मदतकार्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. खोपोली पोलीस स्टेशनच्या कर्तबगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या हातात फावडे आणि इतर साहित्य घेतले आणि भर पावसात रस्त्यावरील माती व दगड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि कष्टांमुळे अवघ्या काही वेळातच रस्त्यावरील धोकादायक ढिगारा बाजूला करण्यात यश आले. पोलिसांनी केवळ वाहतूक सुरळीत केली नाही, तर संभाव्य मोठा अपघातही टाळला. खाकी वर्दीतील या रक्षकांनी संकटसमयी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीचे आणि कर्तव्यदक्षतेचे हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून भरभरून कौतुक केले जात आहे. मार्ग पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा धीम्या गतीने पण सुरळीतपणे पूर्ववत करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog