माणगाव येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण!
अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
माणगाव-रायगड, दि. १८ (प्रतिनिधी) :- माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या कालवण आदिवासीवाडी येथून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने आमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवार, दिनांक १६ जुलै २०२६ रोजी रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही, तिच्या असहायतेचा आणि वयाचा फायदा घेत अज्ञात आरोपीने तिला राहत्या घरातून फूस लावून पळवून नेले.
याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून माणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन माणगाव पोलिसांनी तातडीने तपास चक्रांना गती दिली असून, मुलीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिकणे हे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Post a Comment