विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी खालापूर पोलिसांचा कौतुकास्पद पुढाकार
जी. जे. एम. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये खालापूर पोलिसांतर्फे 'विद्यार्थिनी सुरक्षा व सक्षमीकरण' मार्गदर्शन उपक्रम संपन्न
बेणसे-रायगड, दि. २७ (चंद्रकांत अडसुळे) :- विद्यार्थिनींची सुरक्षितता आणि त्यांचे सक्षमीकरण हा अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचा विषय लक्षात घेऊन, जी. जे. एम. इंग्लिश मिडीयम स्कूल, खालापूर येथे खालापूर पोलिस ठाण्याच्या दामिनी पथकामार्फत एका विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासोबतच कायदेविषयक विविध तरतुदी आणि सुरक्षिततेच्या नियमांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान खालापूर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस हवालदार (बॅच क्र. १५६) सौ. चंदा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रभावी आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी २४ तास उपलब्ध असलेल्या 'डायल ११२' या पोलिस हेल्पलाइन नंबरची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली आणि कोणताही धोका निर्माण झाल्यास न घाबरता या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले. याशिवाय लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'गुड टच आणि बॅड टच'मधील फरक समजावून सांगत, अयोग्य स्पर्शाविरोधात आवाज कसा उठवावा याचे मार्गदर्शन त्यांनी केले. बालकांचे शोषण रोखण्यासाठी असलेल्या बालन्याय कायद्यातील विविध तरतुदींची माहिती देत, विद्यार्थ्यांना पोलिस प्रशासनाशी आपुलकीचे नाते जोडता यावे यासाठी 'पोलीस दीदी' व 'पोलीस काका' या संकल्पनेची सविस्तर ओळख करून देण्यात आली.
सध्याच्या आधुनिक युगात तरुणांसमोरील आव्हानांचा वेध घेत, सौ. गायकवाड यांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक नुकसान यावर प्रकाश टाकला. तसेच वाहतुकीचे नियम पाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगत गाडी चालवताना सीटबेल्टचा वापर करणे, वयोमर्यादेचे पालन करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे शिस्तीने पालन करणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले. बालविवाह रोखणे आणि लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठीच्या विविध कायदेशीर उपायांची माहितीही या प्रसंगी देण्यात आली.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या सोशल मीडियाचा वापर आणि एआय (AI) ट्रेंडमुळे निर्माण होणारे धोके व दुष्परिणाम यावर विशेष चर्चा करण्यात आली. मोबाईलच्या अतिवापराचे तोटे सांगून इंटरनेटचा सुरक्षित आणि मर्यादित वापर कसा करावा, याविषयी विद्यार्थ्यांना सतर्क करण्यात आले. कोणत्याही कठीण प्रसंगात घाबरून न जाता आत्मविश्वासाने स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचे मौलिक विचार या वेळी मांडण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या या यशस्वी कार्यक्रमास जी. जे. एम. इंग्लिश मिडीयम स्कूलचे विद्यार्थी, सर्व शिक्षकवृंद, खालापूर पोलिस ठाण्याच्या महिला अंमलदार (बॅच नं. ६१९) रेणुका राठोड यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या प्रशासनाने खालापूर पोलिस ठाण्याच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.



Comments
Post a Comment