स्ट्रीट लाईटची तुटलेली वायर डोक्याला अडकल्याने दुचाकीस्वाराचा भीषण अपघात!
कार्लेखिंड-हाशिवरे मार्गावरील जलपाडा येथील धक्कादायक घटना
पोयनाड-रायगड, दि. १३ (प्रतिनिधी) :- पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. अलिबाग जवळील कार्लेखिंड ते हाशिवरे रस्त्यावरील जलपाडा येथे एका दुचाकीस्वाराचा स्वतःच्याच वाहनावरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला आणि या अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, या अपघातातील मयत हा त्याच्या ताब्यातील ‘एम.एच. ०६ सी.एच. ९१८३’ या क्रमांकाची स्कूटी मोटारसायकल घेऊन कार्लेखिंड ते हाशिवरे रस्त्याने स्वतः चालवत जात होता. तो प्रवास करत असताना जलपाडा गावच्या हद्दीत पोहोचला असता, रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्ट्रीट पोलची (विजेच्या खांबाची) एक लाईटची काळी वायर तुटून लोंबकळत होती. दुचाकीस्वार तिथून जात असताना अचानक ती तुटलेली काळी वायर त्याच्या डोक्याला अडकली. वायर डोक्यात अडकल्यामुळे वेगात असलेल्या स्कूटीवरील त्याचा ताबा पूर्णपणे सुटला आणि तो दुचाकीसह रस्त्यावर जोरदार कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की, रस्त्यावर पडल्यामुळे त्याच्या डोक्याला अत्यंत गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या आणि त्या जखमांमुळे स्वतःच्या मरणास तो स्वतःच कारणीभूत ठरला.
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ८०/२०२६ नुसार, मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम १८४, तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), १२५(b) आणि २८१ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेगात वाहन चालवणे आणि स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवादार अरुण वाक हे अत्यंत गांभीर्याने करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्त्यावरील लोंबकळणाऱ्या तारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Post a Comment