मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

रोह्यात संतापाचा स्फोट; रेल्वे उड्डाणपुलाच्या निष्काळजीपणाने तरूणाचा बळी! 

ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

 ग्रामस्थांचा रास्ता रोको 


रोहा-रायगड, दि. १० (प्रतिनिधी) :- रोहा रेल्वे उड्डाणपुलाच्या रखडलेल्या आणि हलगर्जी कारभाराने अखेर एका निष्पाप तरुणाचा बळी घेतला. भातसई येथील संकेत कोतवाल (वय ३२) याचा पर्यायी रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यानंतर शुक्रवारी संतप्त ग्रामस्थांनी रोहा-नागोठणे मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडत प्रशासन आणि ठेकेदाराविरोधात जोरदार हल्लाबोल केला. संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृताच्या कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याची ठाम मागणी करण्यात आली.










साडेचार वर्षांपासून कासवगतीने सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे नागरिकांना जीवघेण्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे, कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना नसल्याने दररोज अपघात होत असतानाही प्रशासनाने डोळ्यावर झापड बांधल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.










गुरुवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास संकेत कोतवाल हा दुचाकीवरून भातसईहून रोह्याकडे येत असताना रस्त्यातील खड्ड्यात पडला. त्याचवेळी मागून येणाऱ्या एसटी बसखाली तो सापडल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली.










शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी रोहा-नागोठणे मार्ग रोखून धरत प्रशासनाला जाब विचारला. "संकेतला न्याय मिळालाच पाहिजे", "रेल्वे ठेकेदार हाय हाय", "ढिम्म प्रशासनाचा निषेध असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनस्थळी रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख आणि पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी धाव घेतली. यावेळी ग्रामस्थांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत, मृताच्या कुटुंबाला मदत मिळेपर्यंत आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल होईपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा दिला. आंदोलनात विभागीय नेते नंदकुमार म्हात्रे, सुरेश मगर, सुहास खरिवले यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.










ग्रामस्थांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की, या उड्डाणपुलाचे काम तब्बल साडेचार वर्षांपासून रखडले आहे. ठेकेदारावर सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असल्याने निष्काळजीपणाची एकामागून एक प्रकरणे घडूनही कोणतीही कारवाई होत नाही. या रस्त्यावर यापूर्वीही अनेक अपघात झाले, अनेकजण जखमी झाले; मात्र प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना त्याचे कोणतेही सोयरेसुतक नसल्याने अखेर एका तरुणाचा जीव गेला.

एका निष्पाप तरुणाचा जीव गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का, की आणखी किती बळी गेल्यावर दोषींवर कारवाई होणार, असा संतप्त सवाल आता रोहेकर विचारत आहेत.

Comments

Popular posts from this blog