वडवली येथे मध्यरात्री रस्त्यावर पडलेल्या गरजू दिव्यांग आदिवासी व्यक्तीच्या मदतीला धावले पोलीस आणि जागरूक पत्रकार
पोलिसांच्या मदतीने तात्काळ वैद्यकीय उपचार करून नातेवाईकांच्या सुपूर्द
पत्रकारांची सामाजिक बांधिलकी!
वडवली-श्रीवर्धन, दि. २१ (अनिकेत कांबळे) :- श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावामध्ये रात्री एक अत्यंत संवेदनशील आणि माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना समोर आली आहे. वडवली गावातील सुनील वाघमारे हे आदिवासी गृहस्थ, ज्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असून ते कमरेच्या आजारामुळे आणि शारीरिक दुर्बलतेमुळे नीट चालण्यास असमर्थ आहेत, ते काल सकाळपासूनच रस्त्याच्या कडेला हलाखीच्या अवस्थेत पडलेले होते. सुनील वाघमारे हे दिव्यांग असल्याने त्यांना स्वतःहून उठणे किंवा हालचाल करणे शक्य नव्हते, अशातच त्यांच्या जवळ केवळ एक अन्नाची पिशवी आणि पाण्याची बाटली होती. दिवसभर ते याच असहाय्य अवस्थेत रस्त्यावर पडून होते, मात्र मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जागरूक नागरिकाने आणि पत्रकार आसिफ खान आणि अनिकेत कांबळे यांनी त्यांना रस्त्यावर पडलेले पाहिले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंबा न करता तात्काळ या व्यक्तीला रस्त्यावरून उचलून सुरक्षित बाजूला केले आणि या घटनेची माहिती दिघी सागरी पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या गस्तीवरील (पेट्रोलिंग) पथकाने अत्यंत संवेदनशीलतेने आणि तत्परतेने पावले उचलत घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये पोलीस हवालदार चांदणे आणि पोलीस शिपाई बंडलकर यांनी घटनास्थळी पोहोचून सुनील वाघमारे यांची आस्थेने चौकशी करत माहिती गोळा केली. यानंतर पोलीस प्रशासन आणि उपस्थित जागरूक नागरिकांच्या मदतीने तात्काळ 'श्री गणेश चौलकर जनकल्याण आरोग्य सेवा' (वडवली आगरी समाज) ची रुग्णवाहिका मागवण्यात आली. पोलीस हवालदार चांदणे, पोलीस शिपाई बंडलकर आणि उपस्थित सहकाऱ्यांनी स्वतः सुनील वाघमारे यांना स्ट्रेचरवरून उचलून अत्यंत काळजीपूर्वक रुग्णवाहिकेत ठेवले. या दिव्यांग व्यक्तीला रात्रीच्या वेळीच तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान माहिती देणारे पत्रकार आणि पोलीस अधिकारी स्वतः रुग्णालयात उपस्थित होते आणि दिघी सागरी पोलीस प्रशासनाच्या या कौतुकास्पद कामगिरीचे पत्रकारांनीही कौतुक केले. वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर या व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना रुग्णालयात बोलावून घेण्यात आले आणि सुनील वाघमारे यांना सुरक्षितपणे त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील सर्व काळजी आणि वैद्यकीय प्रक्रिया त्यांचे नातेवाईक पाहत आहेत. मध्यरात्रीच्या वेळी दाखवलेल्या या तत्परतेमुळे एका गरजू आणि दिव्यांग आदिवासी व्यक्तीला वेळेत उपचार मिळू शकले, ज्यामुळे पोलीस प्रशासन आणि पत्रकारांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment