१६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या जाळ्यात!
विशेष मोहिमेत पोलिसांना मोठे यश
श्रीगोंदा-अहिल्यानगर, दि. २५ (प्रतिनिधी) :- श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरार व पाहिजे असलेल्या आरोपींच्या शोधासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना मोठे यश आले आहे. तब्बल १६ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, गेल्या सात दिवसांत पोलिसांनी एकूण आठ फरार आरोपींना जेरबंद केले आहे. श्रीगोंदा न्यायालयातील RCC क्रमांक २०५/२०१० मधील पाहिजे असलेला आरोपी आप्पासाहेब उर्फ अण्णासाहेब लक्ष्मण पुराने (वय ६०, रा. म्हातारपिंपरी, ता. श्रीगोंदा) हा मागील १६ वर्षांपासून फरार होता. तो सातत्याने आपले ठिकाण बदलून पोलिसांना चकवा देत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान बनले होते.
दरम्यान, या आरोपीच्या हालचालींबाबत गुप्त बातमीदारामार्फत श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून अत्यंत कौशल्याने सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबुर्मे आणि पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या यशस्वी मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक मोहिते, पोलीस नाईक गहिनीनाथ यादव, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राऊत, विवेक दळवी, महादेव कोहक, देवेंद्र पळसे, तसेच लोणी व्यंकनाथ बीटचे अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल काटकर आणि पोलीस कॉन्स्टेबल तोरडमल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. फरार आरोपींच्या विरोधात राबवलेली ही विशेष मोहीम आणि झालेली कारवाई अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात असून, यामुळे गुन्हेगारांवर कायद्याचा धाक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Comments
Post a Comment