मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

​रहिमतपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!
८ शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या केबल चोरीचा गुन्हा ८ तासांत उघड
 चोरीला गेलेला १००% माल हस्तगत 


सातारा, दि. २९ (प्रतिनिधी) :- ​रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साप गावच्या खडकी शिवारातून सुमारे ८ शेतकऱ्यांच्या विहिरीवरील आणि कॅनॉलवरील शेतीपंपासाठी वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या केबल वायर २१ ते २२ जून २०२६ दरम्यान चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १०१/२०२६, बी.एन.एस. ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाढत्या उष्णतेमध्ये पिकांना पाणी देण्याच्या ऐन हंगामातच या केबल चोरीला गेल्यामुळे गावातील बळीराजा कमालीचा हवालदिल झाला होता. कोणताही पुरावा उपलब्ध नसताना हा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. याची दखल घेत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी अज्ञात चोरट्यांचा आणि चोरीस गेलेल्या मालाचा तातडीने शोध घेण्याचे आदेश रहिमतपूरच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते.

​त्यानुसार रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विनोद नेवसे यांनी तातडीने तपास पथक तयार करून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. तपास पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत केवळ ८ तासांत या गुन्ह्याचा छडा लावला. पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ८ शेतकऱ्यांच्या विहिरी आणि कॅनॉलवरील शेतीपंपांच्या चोरीला गेलेल्या तांब्याच्या केबल वायर्स, असा एकूण ५५,३०० रुपये किमतीचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यामध्ये दोन विधीसंघर्षित बालकांचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार निकम करत आहेत.

​ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक श्री. गंगाप्रसाद केंद्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार निकम, प्रवीण बर्गे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार काळंगे, राहुल मदने आणि रमेश बर्गे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पोलिसांच्या या जलद कामगिरीमुळे साप गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Comments

Popular posts from this blog