रत्नागिरी पोलीस दलाची अवैध गोवंश मांस विक्रीविरोधात मोठी कारवाई!
उद्यमनगर परिसरातून एकाला अटक, १ लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी, दि. २९ (प्रतिनिधी) :- आगामी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सर्वत्र अत्यंत प्रभावीपणे गस्त घालण्यात येत आहे. यादरम्यान रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला एका मोठ्या बेकायदेशीर कृत्याचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. रत्नागिरी शहर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना, त्यांना उद्यमनगर भागात एका संशयित इसमाकडून अवैधरित्या गोवंश मांसाची विक्री केली जात असल्याची गोपनीय व खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ उद्यमनगर परिसरात धाड टाकून संबंधित संशयित इसमाला रंगेहात पकडले आणि त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईदरम्यान संशयित इसमाची सखोल झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून तब्बल ५१ किलो ५०० ग्रॅम वजनाचे बेकायदेशीर गोवंश मांस जप्त करण्यात आले. याशिवाय, अवैध मांस वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एक दुचाकी गाडी देखील पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेले गोमांस आणि दुचाकी वाहन असा एकूण १,०६,४८० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदरची उल्लेखनीय आणि धडक कारवाई रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. संदीप ओगले, महिला सहाय्यक फौजदार स्वाती राणे, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, गणेश सावंत, सत्यजित दरेकर आणि अतुल कांबळे या पोलीस अंमलदारांच्या पथकाने अत्यंत चोख कामगिरी बजावली. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून रत्नागिरी पोलीस दलाने गुन्हेगारांना एक कडक इशारा दिला असून, पोलीस प्रशासनाच्या या सतर्कतेचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment