अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन सोपवणाऱ्या पालकांनो सावधान!
सोशल मीडियावर पोस्टद्वारे रायगड पोलिसांनी केले जनजागृतीचे आवाहन
रायगड पोलिसांचे कडक कारवाईचे संकेत
रोहा-रायगड, दि. २२ (प्रतिनिधी) :- वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सतर्कतेची चेतावणी जारी केली आहे. सद्यस्थितीत अनेक ठिकाणी अल्पवयीन मुले रस्त्यांवर सर्रासपणे दुचाकी आणि चारचाकी वाहने पळवताना दिसतात, जे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून त्यांच्या स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. याच गंभीर समस्येवर बोट ठेवत रायगड पोलिसांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक भावनिक आणि तितकीच कडक चेतावणी देणारी पोस्ट शेअर केली असून, पालकांनी आतातरी सावध होण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून रायगड पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, अल्पवयीन मुलांना कोणत्याही प्रकारचे वाहन चालविण्यास देणे हा मोटार वाहन कायद्यानुसार अत्यंत गंभीर आणि दंडात्मक कारवाईस पात्र ठरणारा गुन्हा आहे. अनेकदा पालक आपल्या मुलांच्या हट्टापायी किंवा केवळ कौतुकापोटी त्यांच्या हातात महागड्या दुचाकी किंवा चारचाकी गाड्या सोपवतात, परंतु याचे परिणाम किती भयंकर असू शकतात याची जाणीव पोलिसांनी करून दिली आहे. अपरिपक्व वयात वाहन चालवल्यामुळे होणारे गंभीर अपघात, त्यातून येणारे कायमस्वरूपी अपंगत्व आणि काही दुर्दैवी प्रसंगी होणारी जीवितहानी यामुळे हसतेखेळते संपूर्ण कुटुंब एका झटक्यात दुःखाच्या गर्तेत ढकलले जाते, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल ठेवणे ही केवळ प्रशासनाची नाही, तर प्रत्येक पालकाची आद्य कर्तव्य आणि जबाबदारी आहे, असे आवाहन या पोस्टमध्ये करण्यात आले आहे. कायदा आणि दंडात्मक कारवाईच्या पलीकडे जाऊन पालकांनी स्वतःहून एक 'जबाबदार पालक' म्हणून भूमिका बजावणे गरजेचे आहे. वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि आपल्या अल्पवयीन पाल्यांना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालविण्याची परवानगी न देणे, हाच या समस्येवरील एकमेव उपाय असल्याचे पोलिसांनी आवर्जून सांगितले आहे. सुरक्षित पालक, सुरक्षित मुले आणि सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी रायगड पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेला नागरिकांनी आणि पालकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे संकेतही यातून देण्यात आले आहेत.

Comments
Post a Comment