मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

महाडमध्ये ऐन मुहूर्तावर पोलिसांची एन्ट्री!
लग्नमंडपात धाड टाकत बालविवाह रोखला
पोलीस आणि महसूल विभागाची संयुक्त ‘सर्जिकल स्ट्राईक’


​महाड-रायगड, दि. २१ (प्रतिनिधी) :- बालविवाहासारख्या अत्यंत घातक आणि गंभीर सामाजिक कुप्रथेविरोधात महाड एमआयडीसी पोलिसांनी पुन्हा एकदा आपला तडाखा दाखवत सतर्कता आणि कर्तव्यदक्षतेची मोठी प्रचिती दिली आहे. तालुक्यातील वाळण कलकत्त वाडी येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला जाणार असल्याची अत्यंत गोपनीय माहिती महाड एमआयडीसी पोलिसांच्या हाती लागली होती. या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने चक्रे फिरवली आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन थेट लग्नकार्याच्या ठिकाणी संयुक्त धाड टाकली. पोलीस आणि महसूल प्रशासकीय पथकाने ऐनवेळी विवाहस्थळी दणक्यात एन्ट्री केल्यामुळे तेथे उपस्थित वऱ्हाडी आणि नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण धाक दाखवत हा बालविवाह थेट जागेवरच रोखून धरला.

​विवाह थांबवल्यानंतर पोलीस प्रशासनाने केवळ कारवाईचा बडगा न उगारता अत्यंत संवेदनशील मार्ग अवलंबत परिस्थिती हाताळली. त्यांनी अल्पवयीन मुलीच्या माता-पित्यांचे तसेच उपस्थित नातेवाईकांचे कायदेशीर आणि सामाजिक समुपदेशन केले. बालविवाहामुळे मुलीच्या आरोग्यावर, शिक्षणावर आणि मानसिकतेवर होणारे घातक परिणाम आणि यामुळे होणारी कायदेशीर जेल याबद्दल पोलिसांनी त्यांना कडक शब्दांत समजावून सांगितले. पोलिसांच्या या समुपदेशनानंतर आणि कायद्याचा हिसका समजताच कुटुंबीयांचे डोळे उघडले आणि त्यांनी प्रशासनासमोर आपली मोठी चूक मान्य केली. पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांनी हा विवाह तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर, मुलीचे वय कायदेशीररित्या १८ वर्षे पूर्ण होत नाही तोपर्यंत तिचे लग्न लावून देणार नाही, असे लेखी हमीपत्रही कुटुंबीयांनी पोलीस आणि महसूल प्रशासनाला लिहून दिले.

​महाड एमआयडीसी पोलीस आणि महसूल विभागाने वेळीच दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे एका अल्पवयीन मुलीचे बालविवाहाच्या खाईत लोटले जाणारे आयुष्य वाचले असून, तिचे शिक्षण, आरोग्य आणि पर्यायाने एक उज्ज्वल भविष्य सुरक्षित झाले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात बालविवाह करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून प्रशासनाचे भरभरून कौतुक होत आहे. बालविवाह हा कायद्याने अत्यंत गंभीर आणि दंडनिय गुन्हा असून, अशा कुप्रथांना समाजात थारा मिळता कामा नये. आपल्या अवतीभवती असा कोणताही प्रकार घडत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. चला, या निमित्ताने आपण सर्वजण जागरूक नागरिक म्हणून एकत्र येऊया आणि आपल्या देशाला व समाजाला बालविवाहमुक्त करण्यासाठी खंबीरपणे पुढाकार घेऊया.

Comments

Popular posts from this blog