पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक पदावर बाळा कुंभार यांची नियुक्ती
गुन्हेगारांवर वचक बसून कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होणार
पनवेल, दि. ३० (प्रतिनिधी) :- पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि प्रदीर्घ अनुभवी अधिकारी बाळा रघुनाथ कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या या नव्या नियुक्तीमुळे पनवेल शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होण्यासोबतच गुन्हेगारीवर प्रभावी वचक बसेल, अशी आशा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. मूळचे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या बाळा कुंभार यांनी सन २००५ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात प्रवेश केला असून, आपल्या दोन दशकांच्या सेवाकाळात त्यांनी विविध संवेदनशील आणि आव्हानात्मक ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी बजावत एक अभ्यासू, कर्तव्यनिष्ठ आणि जनमानसात विश्वास निर्माण करणारे अधिकारी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेत सीसीटीएनएस (CCTNS) अधिकारी म्हणून कार्यरत असण्यापूर्वी, त्यांनी ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पडघा तसेच कल्याण तालुक्यातील टिटवाळा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. या कार्यकाळात अनेक गंभीर व क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करणे, कायदा-सुव्यवस्था चोख राखणे आणि सर्वसामान्यांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करणे यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. आता पनवेल शहर पोलीस ठाण्याची महत्त्वपूर्ण धुरा स्वीकारल्यानंतर, त्यांच्यासमोर शहरातील महिला सुरक्षा अधिक सक्षम करणे, अवैध धंदे व गुटखा तस्करांवर कठोर कारवाई करणे, बालसुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवणे तसेच हत्या, दरोडे आणि संघटित गुन्हेगारी मोडून काढणे अशी प्रमुख आव्हाने असणार आहेत. मात्र, आपली शिस्त, पारदर्शकता आणि कडक अंमलबजावणी यासाठी ओळखले जाणारे बाळा कुंभार यांच्या कणखर नेतृत्वाखाली पनवेल शहरात कायद्याचा धाक अधिक मजबूत होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षिततेचे वातावरण लाभेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Comments
Post a Comment