मुंबई लोकलमध्ये थरार; दरवाजा बंद करण्याच्या क्षुल्लक वादातून प्रवाशाची हत्या!
आरोपीला २४ तासांत पनवेलमधून अटक
मुंबई, दि. २५ (रणजीत मस्के) :- मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, रेल्वे पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. २३ जून २०२६ रोजी रात्री साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास नालासोपारा फास्ट लोकलच्या मधल्या फर्स्ट क्लास डब्यात ही घटना घडली. पावसाचे पाणी आत येत असल्याने लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून प्रवाशांमध्ये वाद झाला आणि त्याचे पर्यावसान हत्येमध्ये झाले. याप्रकरणी २४ जून २०२६ रोजी पहाटे बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पश्चिम परिमंडळातील पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांची एकूण ७ वेगवेगळी तपास पथके तात्काळ तयार करण्यात आली. या पथकांनी बोरीवली, अंधेरी, मिरा रोड आणि नालासोपारा रेल्वे स्थानकांसह लगतच्या परिसरातील ४०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढत पोलिसांनी रोशन (वय ३० वर्षे, रा. मिरा रोड पूर्व, जिल्हा ठाणे) याला पनवेल परिसरातून ताब्यात घेतले. आरोपी रोशन हा बारकोड बनवण्याचा व्यवसाय करतो. सध्या त्याची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
ही धडक कामगिरी लोहमार्ग मुंबईचे पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पश्चिम परिमंडळाच्या पोलीस उप आयुक्त सुनिता ठाकरे-साळुंके यांच्या निर्देशानुसार पार पडली. या कारवाईत वसई विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त मनिषा रावखंडे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे, बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एम. खुपेरकर, मुंबई सेंट्रलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हमराज कुंभार, बांद्राचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी निकम, अंधेरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे, पालघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले, गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक गणपत सुळे, पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, कुंदा गावडे/डिसोझा, आरपीएफ बोरीवलीचे प्रभारी निरीक्षक अनिल यादव तसेच बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील साळुंके, जाधव, देवरूखकर, शेख, साठे, नरवडे, भोजणे, गोवर्धन जाधव, चौधरी, घुटे, कांबळे, सालकर, कोकणी, पवार आणि राऊत या अधिकारी व अंमलदारांनी मोलाची भूमिका बजावली.

Comments
Post a Comment