मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात!
विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची ट्रकला धडक
 दुचाकी चालकाचा मृत्यू 


​माणगांव-रायगड, दि. २४ (प्रतिनिधी) :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल मंगळवारी एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. दि. २३ जून २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास मुगवली फाट्याजवळ असलेल्या मुंबई बाजूकडील रेल्वे ब्रिजखाली हा अपघात झाला. या अपघातात एका ३५ वर्षीय दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला असून महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

​या घटनेबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी हे बाईतवाडी (मु.पो. भरणे, ता. खेड, जि. रत्नागिरी) येथील रहिवासी असून, ते आपल्या ताब्यातील एल.पी. ट्रक (क्रमांक एम.एच. ०८ एच ०८५३) घेऊन खेड येथून भिवंडीच्या दिशेने मुंबई-गोवा हायवेने स्वतः चालवत जात होते. त्यांचा ट्रक माणगाव जवळील मुगवली फाट्याजवळील रेल्वे ब्रिजखाली आला असता, विरुद्ध दिशेने अत्यंत वेगात येणाऱ्या एका दुचाकीने त्यांच्या ट्रकला समोरून जोरदार धडक दिली.

​हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चालक बाळा दासू चव्हाण (वय ३५ वर्षे, रा. पहेल, पो. लोणेरे, ता. माणगांव) हा आपल्या ताब्यातील मोटार सायकल (क्रमांक एम.एच. ०६ सी.एफ. १५९३) अत्यंत अतिवेगाने, हयगयीने आणि बेदरकारपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या बाजूने (रॉन्ग साईड) घेऊन आला होता. त्याने समोरून येणाऱ्या ट्रकला थेट धडक दिल्याने दुचाकीचा चक्काचूर झाला. या भीषण धडकेत दुचाकी चालक बाळा चव्हाण याला लहान-मोठ्या गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

​या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. या संदर्भात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९४/२०२६ नुसार, मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४, तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५ (a) आणि १२५ (b) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव हे करीत आहेत. महामार्गावरील वाढत्या अतिवेगामुळे आणि रॉन्ग साईड ड्रायव्हिंगमुळे अशा अपघातांचे सत्र वाढत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog