कुलाबा पोलिसांची मोठी कारवाई!
घरातून लाखो रुपयांचे चरस आणि एमडी ड्रग्ज जप्त, एकाला अटक
मुंबई, दि. ८ (रणजीत मस्के) :- मुंबईतील कुलाबा पोलिसांनी एका ड्रग्ज तस्कराविरोधात मोठी कारवाई केली आहे. कुलाबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदुमती साकरीकर मार्ग, पी एल पाटील मार्ग येथील आयुब मेंन्शन या इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ६ जून २०२६ रोजी संध्याकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास आयुब मेंन्शन येथील पहिल्या मजल्यावरील रूम नंबर २ मध्ये राहणारा संशयित आरोपी इब्राहिम मो. रफिक खान (वय ३६ वर्षे, रा. कुलाबवाडी, मुंबई) याच्या घरावर छापा टाकला.
या छाप्यात आरोपी इब्राहिम खान याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बाळगलेला लाखो रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा मिळून आला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १ लाख ४४ हजार २०० रुपये किमतीचे ७.२१ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) सदृश ड्रग्ज आणि तब्बल ५ लाख रुपये किमतीचे ५० ग्रॅम चरस सदृश अंमली पदार्थ जप्त केले. याशिवाय गुन्ह्यात वापरलेला अंदाजे १० हजार रुपये किमतीचा राखाडी (ग्रे) रंगाचा 'रिअलमी' कंपनीचा मोबाईल फोनही पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई हेमराजा उमाजी बाराईत (वय ४१ वर्षे) यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून कुलाबा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २१७/२०२६ नुसार, एन.डी.पी.एस. (NDPS) ॲक्ट १९८५ च्या कलम ८ (क), २०(ब)(२)(अ), २२(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी इब्राहिम खान याला अटक केली असून या गुन्ह्यात आणखी एका पाहिजे (फरार) आरोपीचा शोध सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई दक्षिण परिमंडळ १ चे पोलीस उप आयुक्त मनीष कलवानिया, कुलाबा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शशिकिरण काशीद आणि कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाई पथकात पोलीस निरीक्षक कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक ढेरे, पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव, पोलीस हवालदार चौधरी, तसेच पोलीस शिपाई बाराईत, हडवळे आणि वैद्य यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव करत आहेत.

Comments
Post a Comment