चर्चगेट-विरार लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा हायड्रामा!
मयंक लोहार हत्या प्रकरणांनंतरही रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
दादर-मुंबई, दि. २७ (मंदेश मोरे) :- मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. अवघ्या पाच दिवसांपूर्वी चर्चगेट-विरार लोकल ट्रेनमध्ये मयंक लोहार या २२ वर्षीय तरुणाची झालेली निघृण हत्या अजूनही ताजी असतानाच, काल रात्री याच मार्गावरील लोकल गाड्यांमध्ये सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. एका लोकल ट्रेनच्या थेट मुख्य दरवाजावरच एक इसम प्रचंड नशेमध्ये मद्यधुंद अवस्थेत आडवा झोपला होता. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला असून, यामुळे मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. लोकल गाड्यांमध्ये होणारी गर्दी पाहता, ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना जर चुकून कोणाचा पाय या मद्यधुंद व्यक्तीला लागला, तर तो हिंसक होऊन प्रवाशांवर हल्ला करू शकतो, अशी रास्त भीती लोकांच्या मनात निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वीच घडलेल्या मयंक लोहार हत्या प्रकरणामुळे आधीच धास्तावलेले प्रवासी या परिस्थितीमुळे अधिकच काळजीत पडले होते. मुंबईत रात्रीच्या वेळी लाखो चाकरमणी आपल्या कुटुंबाकडे सुखरूप पोहोचण्यासाठी घाईघाईने प्रवास करत असतात, अशा वेळी रेल्वेच्या डब्यात आणि दारात अशा प्रकारे नशेखोरांचे साम्राज्य असणे अत्यंत चिंताजनक आहे.
या संपूर्ण गंभीर घटनेमुळे रेल्वे पोलीस आणि प्रशासनाच्या सुरक्षेच्या दाव्यांवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एका बाजूला रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलीस (GRP) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे दावे करत असताना, दुसऱ्या बाजूला थेट ट्रेनच्या गेटवर अशा प्रकारे कायदा हातात घेणारे नशेखोर बिनधास्तपणे वावरत आहेत. रेल्वे प्रशासन अजून किती प्रवाशांचे बळी जाण्याची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य मुंबईकरांकडून विचारला जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी रात्रीच्या वेळी लोकल गाड्यांमध्ये गस्त वाढवावी आणि अशा समाजकंटकांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.

Comments
Post a Comment