भिसे खिंडीत डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू!
डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
रोहा-रायगड, दि. २२ (संदीप सरफळे) :- रोहा-नागोठणे मार्गावरील भिसे खिंडीत झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. २० जून) रात्री घडली. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध रोहा पोलिस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा तसेच अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुष्कर महेंद्र जावरे (वय २४, रा. एकता नगर, रोहा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पंकज अरुण मिस्त्री (वय २९, रा. पाटणसई, ता. रोहा) हा डंपर क्रमांक एमएच-०६/बीव्ही-७५९४ चालवत रोहा-नागोठणे मार्गावरील भिसे खिंडीतून जात होता. घाटातील वळणाचा रस्ता असल्याची माहिती असूनही त्याने डंपर भरधाव, अविचाराने व बेदरकारपणे चालविल्याचा आरोप आहे.
त्याचवेळी राज गणेश पतंगे (वय २२, रा. अष्टमी कोळीवाडा, रोहा) हा त्याची केटीएम मोटारसायकल (एमएच-०६/सीटी-६७०९) घेऊन नागोठणेहून रोह्याकडे येत असताना घाटातील वळणावर डंपरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात राज पतंगे याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. तसेच दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले.
अपघातानंतर चालकाने जखमीला मदत न करता अथवा पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जखमीला उपचारासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
याबाबत रोहा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १८३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१,१२५(अ), १२५(ब), मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मारूती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय इद्रंपाल पायक हे करीत आहेत.

Comments
Post a Comment