कर्तव्य, नोकरी आणि जिद्दीचा त्रिवेणी संगम
ममता शेखर भगत यांचे वकिली परीक्षेत घवघवीत यश!
बौद्धजन पंचायत समितीच्या बौद्धाचार्या सौ. ममता भगत यांनी मिळवला विधी पदवीचा बहुमान
रायगड व मुंबईतून अभिनंदनाचा वर्षाव
बेणसे-रायगड, दि. २२ (चंद्रकांत अडसुळे) :- सध्याच्या आधुनिक युगात महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरी आणि सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाची जिद्द जिवंत ठेवता येते, याचंच एक आदर्श आणि प्रेरणादायी उदाहरण रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात समोर आलं आहे. पेण तालुक्यातील बेणसे सिद्धार्थ नगर येथील रहिवासी आणि मुंबईतील नामवंत समाजसेवक तथा आंबेडकर चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व शेखर भगत यांच्या सुविद्य पत्नी सौ. ममता शेखर भगत यांनी वकिलीच्या (एल.एल.बी.) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या जुहू, विलेपार्ले (पश्चिम) येथील प्रसिद्ध 'आधिया कॉलेज ऑफ लॉ'मधून आपले विधी शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून कायद्याची पदवी पदरात पाडून घेतली आहे. त्यांच्या या यशामुळे बेणसे परिसरासह संपूर्ण रायगड जिल्हा आणि मुंबईतील सामाजिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सौ. ममता भगत यांचा हा शैक्षणिक प्रवास सोपा नव्हता. त्यांनी घरची सर्व जबाबदारी सांभाळून, मुलांचे संगोपन करत आणि कौटुंबिक कर्तव्य पार पाडत आपली नोकरीही चालू ठेवली. अशा व्यस्त दिनक्रमातही त्यांनी आधी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, पदवीधर झाल्यानंतर केवळ तिथेच न थांबता, समाजात वावरताना आणि काम करताना कायद्याचे सखोल ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे, हा दूरगामी उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मुंबईत एल.एल.बी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. नोकरीची वेळ, कुटुंबाची निकड आणि अभ्यासाचा ताण अशा सर्व आघाड्यांवर एकाच वेळी लढत त्यांनी अत्यंत कठोर मेहनत घेतली. दिवसा नोकरी आणि रात्रीचा दिवस करून केलेला अभ्यास, या चिकाटीच्या जोरावर त्यांनी कायद्याची कठीण परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन दाखवली.
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम हे यशाचे तीन मजबूत खांब आहेत, ज्यांच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करता येतात आणि ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर होतो. या विधानाचे जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच सौ. ममता भगत या ठरल्या आहेत. आजच्या काळातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची लेक म्हणून त्यांनी प्रत्येक महिलेसमोर एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ निर्माण केला आहे. शिक्षण घेण्यासाठी वय, कुटुंब, लग्न किंवा नोकरी ही कधीच आडवी येत नाही; अडचण असते ती फक्त मनाच्या दुबळेपणाची. जर आपण आपल्या मनाचा हा दुबळेपणा झटकून दिला आणि मनात काहीतरी करून दाखवण्याची ठाम जिद्द बाळगली, तर कोणतीही अशक्य गोष्ट सहज साध्य करता येते, हाच मोलाचा संदेश सौ. ममता यांनी आपल्या कृतीतून समाजातील इतर महिलांना दिला आहे.
सौ. ममता भगत या केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही अत्यंत सक्रिय आहेत. त्या बौद्धजन पंचायत समितीच्या 'बौद्धाचार्या' म्हणून धार्मिक जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. याशिवाय बौद्ध समाज सेवा संघ (रोहा, रायगड जिल्हा) या संघटनेच्या उपजिल्हाध्यक्षा, रमाई महिला मंडळ (बेणसे) च्या अध्यक्षा, तसेच मुंबई सांताक्रूझ बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. १५४ च्या प्रबुद्ध महिला मंडळाच्या सरचिटणीस म्हणूनही त्या अत्यंत महत्त्वाची पदे भूषवत आहेत. नोकरी सांभाळून त्या मुंबई आणि आपले मूळ गाव अशा दोन्ही ठिकाणी सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करत आहेत.
आपल्या या यशाबद्दल आणि पुढील ध्येयाबद्दल बोलताना सौ. ममता भगत यांनी सांगितले की, "या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग मी केवळ पदवी मिळवण्यासाठी केला नसून, आगामी काळात समाजातील वंचित, शोषित, महिला, दलित, आदिवासी आणि पीडित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी करणार आहे." तसेच, कायद्याचा कठीण अभ्यास करताना आणि ही पदवी संपादन करताना आपल्याला पती शेखर भगत, मुले कुणाल भगत आणि अदिप भगत यांचे पाऊलोपाऊल मोलाचे सहकार्य लाभले, त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आणि दिलेल्या विश्वासामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचून वकील होऊ शकले, अशी कृतज्ञताही त्यांनी भावूक होऊन व्यक्त केली.
त्यांच्या या दैदिप्यमान आणि उज्ज्वल यशाची बातमी समजताच सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बौद्धजन पंचायत समिती-मुंबईचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सम्यक कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्था (बेणसे-रायगड) चे अध्यक्ष चंद्रकांत अडसुळे, बेणसे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संतोष अडसुळे, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर डिकळे, अमित अडसुळे, रवींद्र अडसुळे, आदिनाथ अडसुळे, रमाई महिला मंडळ (बेणसे) च्या सर्व महिला पदाधिकारी, बौद्धजन समाजसेवा संघ (बेणसे), बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १५४ चे सर्व कमिटी सदस्य, रोहा तालुक्यातील तमाम बौद्ध बांधव आणि विविध महिला मंडळांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष व सोशल मीडियाच्या माध्यमातून सौ. ममता भगत यांचे जाहीर अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वकिली व्यवसायातील प्रवासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.


Comments
Post a Comment