रोह्यात अंमली पदार्थांवर पोलिसांची कारवाई!
३१७ ग्रॅम गांजा जप्त करत आरोपीला ठोकल्या बेड्या
रोहा-रायगड, दि. २६ (प्रतिनिधी) :- रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. रोहा शहरातील खालचा मोहल्ला येथे एका आरोपीला बेकायदेशीरपणे गांजा विक्री करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले. आरोपीच्या अंगझडतीत त्याच्या ताब्यातून तब्बल ३१७ ग्रॅम वजनाचा अवैध 'गांजा' हा मादक व नशाकारक अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. हा साठा स्वतःच्या ताब्यात बाळगून त्याची बेकायदेशीर विक्री करण्याचा आरोपीचा हेतू असल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली. या धडक कारवाईनंतर रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १३९/२०२६ नुसार, अंमली पदार्थ विरोधी कायदा म्हणजेच एन.डी.पी.एस. (NDPS) अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची पाळेमुळे शोधण्यासाठी आणि पुढील सखोल तपास करण्यासाठी परिवीक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक (भापोसे) माननीय श्री. सुयश कुमार सिंह यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली आहेत.

Comments
Post a Comment