मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

रेवदंडा पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल!
साक्षीदाराला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी


रेवदंडा-रायगड, दि. २५ (प्रतिनिधी) :- रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे आंदोशी (ता. अलिबाग) येथे अवैध माती उत्खननाबाबत माहिती देणाऱ्या एका साक्षीदाराला बेदम मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना २४ मे २०२६ रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध रेवदंडा पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, आंदोशी येथील राजेंद्र शिवराम चेरकर यांच्या मालकीच्या शेतात महसूल विभागाचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी नसताना बेकायदेशीरपणे मातीचे उत्खनन सुरू होते. या अवैध उत्खननाबाबत फिर्यादी हे उपस्थित साक्षीदाराला शासनाच्या दंडात्मक कारवाईची कार्यपद्धती आणि दंडाच्या रकमेबाबत माहिती देत होते. फिर्यादी आपले कायदेशीर कर्तव्य बजावत असतानाच, आंदोशी येथील रहिवासी असलेला आरोपी त्या ठिकाणी आला. रेवदंडा पोलीस ठाण्यात पूर्वी दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांनी दिलेल्या साक्षीमुळे आपल्याला कोर्टात शिक्षा झाली, याचा तीव्र राग आरोपीच्या मनात होता.

​त्याच रागातून फिर्यादीला शासकीय काम करण्यापासून परावृत्त करण्याच्या हेतूने आरोपीने त्यांना अत्यंत अश्लील आणि शिवीगाळ भाषा वापरण्यास सुरुवात केली. "मागच्या वेळीही तू मार खाल्ला होतास, तुझ्यामुळेच मला कोर्टात सजा झाली, आता तू चांगलाच सापडला आहेस," असे म्हणत आरोपीने फिर्यादीच्या टी-शर्टची गळपट्टी धरली. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या दोन्ही गालांवर चार-पाच वेळा जोरजोरात चापटी मारून त्यांना जबर धक्काबुक्की केली. एवढ्यावरच न थांबता, जर तू या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलास, तर तुझा संध्याकाळपर्यंत मर्डर (खून) करून टाकीन, अशी थेट जीवे मारण्याची धमकीही आरोपीने फिर्यादीला दिली. या हिंसक कृत्याद्वारे आरोपीने फिर्यादीला त्यांचे कायदेशीर कर्तव्य पार पाडण्यापासून रोखून सरकारी कामात मोठा अडथळा निर्माण केला.

​या गंभीर प्रकारानंतर फिर्यादी यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून रेवदंडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ६२/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवादार नवनाथ गावडे यांच्याकडून केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog