मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

पाणी भरण्याच्या किरकोळ वादातून पेणमध्ये हाणामारी! 
 दोन आरोपींना अटक 


रामवाडी-रायगड, दि. ८ (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मौजे एसटी कॉलनी, रामवाडी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी पेण पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

​घटनेची सविस्तर माहिती अशी की, ५ मे २०२६ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास रामवाडी येथील एसटी कॉलनी परिसरात पाणी भरण्यावरून फिर्यादी महिला आणि आरोपी महिला यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. वादाचे स्वरूप वाढत गेल्याने फिर्यादीची मुलगी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आली. मात्र, संतापलेल्या आरोपी महिलेने 'तू मध्ये पडू नकोस' असे ओरडत तिला जोराने बाजूला ढकलून दिले. रागाच्या भरात असलेल्या आरोपीने जवळच पडलेला सिमेंटच्या पत्र्याचा तुकडा उचलून फिर्यादीच्या मुलीच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला आणि डाव्या हातावर जोराने प्रहार केला, तसेच तिला पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

​आपल्या मुलीला वाचवण्यासाठी फिर्यादी महिलेने धाव घेऊन आरोपीचा हात पकडला असता, आरोपी महिलेने फिर्यादीचे केस ओढून त्यांच्या डोक्यात स्टीलची कळशी मारून त्यांना जखमी केले. हा गोंधळ पाहून फिर्यादीचे पती आणि आरोपी क्रमांक २ हे भांडण सोडवण्यासाठी घटनास्थळी धावून आले. परंतु, यावेळी आरोपी क्रमांक २ याने फिर्यादीच्या पतीचा टी-शर्ट ओढून तो फाडून टाकला आणि त्यांचे नुकसान केले.

​मारहाणीच्या या प्रकारानंतर फिर्यादी महिला आपल्या पतीसह पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाल्या असता, आरोपींनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. आरोपी महिलेने फिर्यादीच्या पतीला चालत्या मोटारसायकलवरून ढकलून दिले आणि पुन्हा एकदा शाब्दिक बाचाबाची सुरू केली. यावेळी आरोपी महिलेने जवळच पडलेली मातीची वीट उचलून फिर्यादीच्या पतीला मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने तिला रोखण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी क्रमांक २ याने फिर्यादीचे केस पकडून त्यांना मागे ढकलून दिले. 'तू पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला कशी जातेस तेच बघतो' अशी धमकी देत आरोपींनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली आणि त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

​या गंभीर प्रकारानंतर पीडित कुटुंबाने पेण पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ७४, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ८६/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवली आणि ६ मे २०२६ रोजी सायंकाळी ७:१७ वाजण्याच्या सुमारास दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार धनावडे या करत असून, भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments

Popular posts from this blog