खासगी बसची कारला जोरदार धडक!
नागोठणे जवळील अपघातात प्रवासी जखमी
नागोठणे, दि. ६ (प्रतिनिधी) :- मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ आणि वेगावर नियंत्रण नसल्यामुळे अपघातांचे सत्र सुरूच असून, नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भरधाव खासगी बसने कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. या भीषण अपघातात कारमधील प्रवासी जखमी झाले असून वाहनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गोडसई गावाच्या हद्दीतील पंजाबी ढाब्यासमोर घडला. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील गोटेघर येथील रहिवासी असलेले फिर्यादी हे आपल्या ताब्यातील 'इर्टिका' कार (क्रमांक एम.एच. ०४ एल. व्हाय. ५९८८) घेऊन गोव्याहून भिवंडीच्या दिशेने प्रवास करत होते. कार मुंबई-गोवा हायवेवरून जात असताना गोडसई परिसरातील हॉटेल पंजाबी ढाब्यासमोर आली असता, मागून अतिशय वेगाने येणाऱ्या एका खासगी बसने (क्रमांक एम.एच. ४७ बी.एस. ६२९९) कारला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की बसच्या धडकेमुळे कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यामध्ये प्रवास करणाऱ्या फिर्यादींना शारीरिक दुखापत झाली आहे. बस चालकाने आपल्या ताब्यातील वाहन चालवताना वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन केले आणि मानवी जीवनास धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणे वाहन चालवून हा अपघात घडवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या बसचा चालक रत्नागिरी येथील रहिवासी असल्याचे समजते.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा रजि. नं. ८५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास महिला पोलीस हवालदार दिपाली पाटील या करत असून, महामार्गावरील या वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Post a Comment