मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

बनावट सोने देऊन म्हसळ्यातील व्यापाऱ्याची १५ लाखांची फसवणूक!
आंतरराज्यीय टोळीचा रायगड पोलिसांकडून पर्दाफाश


​म्हसळा-रायगड, दि. २५ (प्रतिनिधी) :- बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवून एका हार्डवेअर व्यापाऱ्याला तब्बल १५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कमी किमतीत खरे सोने देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून, मूळच्या राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील असलेल्या या भामट्यांना रोहा भागातील किल्ला गावातून अटक करण्यात आली आहे.  

​याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, म्हसळा येथील साळीवाडा मार्ग, करंबे गल्ली येथे राहणारे ३१ वर्षीय राहुल कांतीलाल जैन यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. १५ मे २०२६ रोजी सकाळी ११.५० ते दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास मौजे म्हसळा येथील सुनील कोकचा यांच्या ऑफिसमध्ये ही घटना घडली होती. या आंतरराज्यीय टोळीतील भामटे फिर्यादी राहुल जैन यांच्या संपर्कात आले. त्यांनी जैन यांना आपल्याकडे सोन्याचे दागिने असल्याचे सांगितले आणि ते अस्सल सोने असून कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या आणि अप्रमाणिक हेतूने त्यांनी हे बनावट दागिने जैन यांना दाखवून ते खरेच आहेत असा विश्वास संपादन केला. या दागिन्यांच्या मोबदल्यात त्यांनी राहुल जैन यांच्याकडून १५ लाख रुपये रोकड घेतली आणि दागिन्यांची बॅग देऊन तिथून पोबारा केला. काही वेळाने हे दागिने बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे राहुल जैन यांच्या निदर्शनास आले.  

​या फसवणूकप्रकरणी राहुल जैन यांनी तातडीने म्हसळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच दिवशी म्हणजेच १५ मे रोजी रात्री २०.३९ वाजता भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ७५/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला. 

​गुन्हा दाखल झाल्यानंतर रायगडचे पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि श्रीवर्धन विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे जलद गतीने फिरवण्यात आली. या मोहिमेसाठी नियुक्त केलेल्या थेट तपास पथकामध्ये म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुमित खोत आणि गुन्ह्याची नोंद करणारे पोलीस उपनिरीक्षक डी. व्ही. एडवळे यांचा समावेश होता. या अधिकाऱ्यांसह त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सचिन शेलार, सागर चितारे, शौकत मुल्ला, विवेक ठाकरे आणि अक्षय पुरी यांनी अत्यंत कौशल्याने ही कामगिरी पार पाडली.  

​तपास पथकाने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी आधुनिक 'नेटग्रीड' (NETGRID) ॲपची मदत घेत तांत्रिक तपास सुरू केला होता. या तांत्रिक तपासाच्या आधारे रायगड पोलिसांच्या या पथकाने अत्यंत चाणाक्षपणे माग काढत, राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील असलेल्या या आंतरराज्यीय टोळीला रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील किल्ला गावातून अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या.  

​या धडक कारवाईनंतर पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. कोणत्याही अज्ञात व्यक्तींकडून कमी किमतीत सोने विक्रीच्या आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये, तसेच आसपास असा कोणताही संशयास्पद व्यवहार अथवा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती तात्काळ स्थानिक पोलिसांना द्यावी, असे आवाहन रायगड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog