म्हसळा तालुक्यातील सुरई येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण!
अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
म्हसळा-रायगड, दि. ४ (प्रतिनिधी) :- म्हसळा तालुक्यातील सुरई गावातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुरई येथील पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी महिला आपल्या कुटुंबासह सुरई येथे वास्तव्यास असून, घटनेच्या वेळी सर्वजण घरात साखरझोपेत होते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने पीडित मुलीला काहीतरी आमिष दाखवून किंवा फूस लावून तिच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले. पहाटेच्या सुमारास मुलगी घरात नसल्याचे निदर्शनास येताच कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली, मात्र तिचा कोठेही पत्ता लागला नाही. अखेर आपली मुलगी बेपत्ता नसून तिला कुणीतरी अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची खात्री पटल्यानंतर पीडित मातेने पोलिसांत धाव घेतली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत म्हसळा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक सुमित खोत यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलीस तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांच्या साहाय्याने आरोपीचा आणि मुलीचा शोध घेत आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

Comments
Post a Comment