सिगारेट मागण्यावरून हॉटेलमध्ये राडा!
महिलेसह सुनेला अश्लील शिवीगाळ करत चालकाला जिवे मारण्याची धमकी
माणगाव पोलिसांत गुन्हा दाखल
माणगाव-रायगड, दि. २५ (प्रतिनिधी) :- मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या खांदाड (ता. माणगाव) येथील हॉटेल निलंबरमध्ये सिगारेट मागण्याच्या कारणावरून एका इसमाने प्रचंड राडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तळा तालुक्यातील चरई खुर्द येथील एका संशयित आरोपीविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी २४ मे २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबई-गोवा हायवे रोडच्या बाजूला असलेल्या अंगण शॉपिंग कॉम्प्लेक्समधील हॉटेल निलंबरमध्ये एक ग्राहक आला. त्याने थेट हॉटेलच्या काउंटरवर जाऊन तिथे उपस्थित असलेल्या मॅनेजरकडे 'मला आत्ताच्या आत्ता सिगारेट पाहिजे' असे म्हणून विनाकारण हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मॅनेजर आणि त्या ग्राहकामध्ये वाद होत असल्याचे पाहून हॉटेलच्या महिला मालक आणि त्यांची सून या दोघी त्या ग्राहकाला शांत करण्यासाठी आणि समजवण्यासाठी पुढे आल्या.
मात्र, स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या महिलांवरच आरोपीने आपला राग काढला. त्याने महिला फिर्यादी यांच्याकडे पाहून अत्यंत अश्लील हातवारे केले आणि जाहीरपणे घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने फिर्यादी यांच्या सुनेलाही जागेवरच धमकावले. या गोंधळात जेव्हा फिर्यादी यांचा मुलगा मध्यस्थी करण्यासाठी आला, तेव्हा आरोपीने त्याला थेट जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या वादादरम्यान आरोपीने प्रचंड संतप्त होऊन हॉटेलमधील टेबल तोडून मोठे नुकसान केले आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले.
या अचानक झालेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या महिला फिर्यादी यांनी तात्काळ माणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून माणगाव पोलिसांनी चरई खुर्द (पो. तळेगाव, ता. तळा) येथील संबंधित आरोपीविरुद्ध माणगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १५५/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७९, ३५२, ३५१(२) आणि ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महिला पोलीस अंमलदार गुरव या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.

Comments
Post a Comment