मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

महाडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर उभ्या कंटेनरला कारची धडक
भीषण अपघातात दहिसरच्या एकाचा मृत्यू, तर पाच जखमी!


​महाड-रायगड, दि. १५ (प्रतिनिधी) :- मुंबई-गोवा महामार्गावर महाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांढवे गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या एका कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत दहिसर येथील एका रहिवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, कारमधील अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी महाड पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हरियाणा राज्यातील मेवात जिल्ह्यातील नूह तालुक्यातील मछरोली येथील रहिवासी असलेला कंटेनर चालक आपल्या ताब्यातील कंटेनर (क्रमांक आर जे ३७/जी ए /७३६९) घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. महाड तालुक्यातील चांढवे टोलनाक्याजवळ पोहोचल्यानंतर त्याने आपला कंटेनर मुंबई-गोवा महामार्गाच्या गोवा-मुंबई लेनवर अत्यंत निष्काळजीपणे उभा केला. हा कंटेनर अशा स्थितीत उभा करण्यात आला होता की, ज्यामुळे इतर वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण होऊन वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.

​त्याच वेळी गोवा बाजूकडून मुंबईच्या दिशेने 'स्विफ्ट डिझायर' कार (क्रमांक एम एच ४७/ए जी /४८३६) अत्यंत वेगाने येत होती. महामार्गावर उभ्या असलेल्या या अवजड कंटेनरचा अंदाज न आल्यामुळे कारची पाठीमागून कंटेनरला भीषण धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या भीषण अपघातामध्ये कारमधील प्रवासी, जे मुंबईतील दहिसर पश्चिम येथील 'पलक प्लुटो' इमारतीचे रहिवासी आहेत, त्यांना गंभीर दुखापत झाली. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, इतर प्रवासी गंभीर आणि किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत. अपघातातील मृताच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

​या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच महाड एम.आय.डी.सी. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले आणि अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला. निष्काळजीपणे वाहन उभे करून इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंटेनर चालकावर महाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८५, १२५(अ), आणि १२५(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. मुढे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. महामार्गावर अशा प्रकारे अनधिकृतपणे आणि धोकादायक स्थितीत वाहने उभी करणाऱ्या चालकांमुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog