महाड शहरात हायवा डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू!
झारखंडमधील चालक पोलिसांच्या ताब्यात
महाड-रायगड, दि. ११ (प्रतिनिधी) :- महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भरधाव हायवा डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. महाड शहरातील दोषी पेट्रोल पंपाच्या समोरील सर्व्हिस रोडवर हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, या अपघातातील आरोपी गुलाम मुस्तफा (राहणार सुकरी, पोस्ट इचक, जिल्हा हजीराबाग, राज्य झारखंड) हा आपल्या ताब्यातील एम.एच.०८.एच.२६५० क्रमांकाचा हायवा डंपर घेऊन सर्व्हिस रोडवरून जात होता. दोषी पेट्रोल पंपाजवळ आल्यावर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. डंपर मागे-पुढे करून वळण घेत असताना, चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला. याच वेळी रस्त्याच्या कडेला एम.एच.०६.बी.ए.९७०६ क्रमांकाची मोटारसायकल घेऊन थांबलेल्या चालकाला या डंपरने जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार थेट रस्त्यावर फेकला गेला. दुर्दैवाने, डंपरचे पुढचे चाक थेट त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली, मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.
याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५ (अ) आणि १२५ (ब) अंतर्गत आरोपी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेगाने वाहन चालवणे आणि मानवी जीवितास धोका निर्माण करणे अशा विविध कलमान्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शिवराम खाडे हे करीत आहेत.

Comments
Post a Comment