मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

​पावसाचे पाणी जाण्याच्या कारणावरून खारगाव येथे महिलेला फावड्याने मारहाण करण्याचा प्रयत्न!
 ५ जणांवर गुन्हा दाखल 


रोहा-रायगड, दि. २४ (प्रतिनिधी) :- ​रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारगाव येथे दोन घरांच्या मधून पावसाचे पाणी जाण्याच्या किरकोळ कारणावरून एका महिलेला लोखंडी फावड्याने मारहाण करण्याचा प्रयत्न करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मौजे खारगाव, तालुका रोहा येथील रहिवासी असलेल्या महिला फिर्यादी यांच्या घराच्या जोत्यालगतची माती आरोपी क्रमांक १ हा फावड्याने काढत होता. यावेळी फिर्यादी महिलेने दोन्ही घरांच्या मधून पावसाचे पाणी व्यवस्थित जाऊ द्या, असे आरोपीला सांगितले. मात्र, या साध्या गोष्टीचा आरोपी क्रमांक १ याला प्रचंड राग आला. त्याने मनात राग धरून फिर्यादी महिलेला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि हातातील लोखंडी फावडा उगारून तो महिलेच्या अंगावर धावून गेला.

​हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर आरोपी क्रमांक २, ३, ४ आणि ५ यांनी आपापसात संगनमत केले. त्यांनी बेकायदेशीर जमाव (गैरकायद्याची मंडळी) जमवून फिर्यादी महिलेला घेरले. या सर्व आरोपींनी मिळून महिलेला अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

​या घटनेनंतर पीडित महिलेने तातडीने रोहा पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून रोहा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा रजि. नंबर १३८/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११५(२) (इच्छापूर्वक दुखापत करणे), ३५१(१) (गुन्हेगारी धमकी), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे), १८९ (बेकायदेशीर जमाव), १९० (बेकायदेशीर जमावाचा सदस्य असणे), १३१ आणि ३(५) (समान हेतूने केलेले कृत्य) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रोहा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यावर लक्ष ठेवून असून, घटनेचा पुढील अधिक तपास महिला सहाय्यक फौजदार मंगल टेमकर या करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog