महाडमध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १२ लाख ५१ हजारांची लूट!मध्यप्रदेशातून तिघांना अटक महाड शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
महाड-रायगड, दि. १४ (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक महाड शहरात 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली एका नागरिकाची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चवदार तळे परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला कायद्याचा धाक दाखवून सायबर गुन्हेगारांनी तब्बल १२ लाख ५१ हजार रुपयांचा गंडा घातला होता. याप्रकरणी महाड शहर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास चक्र फिरवत थेट मध्यप्रदेश गाठले आणि या गुन्ह्यातील मुख्य तीन सूत्रधारांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी यांना अज्ञात आरोपींनी फोन करून आपण तपास यंत्रणेकडून बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर त्यांना एका कथित गुन्ह्यात अडकवण्याची आणि 'डिजिटल अरेस्ट' करण्याची धमकी देऊन मानसिक दडपणाखाली आणले. या भीतीपोटी फिर्यादीने आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यात वेळोवेळी एकूण १२ लाख ५१ हजार रुपये वर्ग केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने महाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. ११/२०२६ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केल्यानंतर या गुन्ह्याचे धागेदोरे मध्यप्रदेश राज्यातील छिंदवाडा जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार, पोलीस हवालदार भालशेकर, पोलीस हवालदार सुरडकर, पोलीस कॉन्स्टेबल चित्ते आणि पोलीस कॉन्स्टेबल संपते यांच्या पथकाने मध्यप्रदेशातील परासिया भागात सापळा रचला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने या पथकाने सौरभ बजरंग यादव, शरद राजकुमार देहारिया आणि हरिष राजू गडेवाल या तीन संशयितांना ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच या तिन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. हे तिन्ही आरोपी मूळचे मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया येथील रहिवासी असून, त्यांनी अशाच प्रकारे इतर ठिकाणीही फसवणूक केली आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. अटकेत असलेल्या आरोपींना महाड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची गुन्ह्यातील भूमिका आणि तपासाची गरज लक्षात घेऊन १६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महाड शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी फोन कॉलला बळी पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment