डंपिंग ग्राऊंडवर विजेचा शॉक लागून कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू!
प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप
रोहा-रायगड, दि. १४ (संदीप सरफळे) :- रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत डंपिंग ग्राऊंड परिसरात काम करत असताना विजेचा तीव्र शॉक लागून एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशोक कुशा वाघमारे (वय 42 वर्ष रा. चणेरा) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
रंजना वाघमारे (मयताची पत्नी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक वाघमारे नियमितप्रमाणे डंपिंग ग्राऊंड परिसरात साफसफाई व मशीनमध्ये कचरा जाळण्याचे काम करत होता. यावेळी मशीनमधील विद्युत प्रवाहाचा त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. गंभीर अवस्थेत त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक सुयश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार स्वप्निल म्हात्रे व सुनील सपकाळ करीत आहेत.
डंपिंग ग्राऊंड परिसरात सुरक्षेच्या कोणत्याही प्रभावी उपाययोजना नसल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या दुर्घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Comments
Post a Comment