‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत ६६ हजारांचे ब्राऊन हेरॉईन जप्त!
रत्नागिरीत पोलिसांची मोठी कारवाई
रत्नागिरी, दि. ३ (प्रतिनिधी) :- रत्नागिरी शहरामध्ये अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, 'मिशन फिनिक्स' मोहिमेअंतर्गत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला मोठे यश प्राप्त झाले आहे. कोकण नगर परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी एका इसमाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून तब्बल ६६ हजार रुपये किमतीचे ब्राऊन हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे विशेष पथक आपल्या हद्दीमध्ये नियमितपणे गस्त घालत होते. यावेळी कोकण नगर परिसरामध्ये फिरत असताना पोलिसांना एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी तातडीने या इसमाला अडवून त्याची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांचा संशय बळावल्याने त्याची अंगझडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान संबंधित व्यक्तीकडे अमली पदार्थांचा साठा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
अधिक तपासाअंती या इसमाकडे असलेला पदार्थ हा 'ब्राऊन हेरॉईन' असल्याचे स्पष्ट झाले. हा अमली पदार्थ तो परिसरात विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन आला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याच्या ताब्यातील सुमारे ६६ हजार रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आणि त्याला पोलीस कोठडीत घेतले आहे. हा माल त्याने कोठून आणला होता आणि यामागे आणखी कोणते मोठे रॅकेट सक्रिय आहे का, याचा सविस्तर तपास आता पोलीस करत आहेत.
सदरची यशस्वी कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील व त्यांच्या विशेष पथकाने या मोहिमेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. अमली पदार्थ मुक्त रत्नागिरीसाठी राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेचे नागरिकांकडून कौतुक होत असून, अशा समाजविघातक कृत्यांविरुद्ध यापुढेही कठोर पावले उचलली जातील, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Comments
Post a Comment