टिटवाळ्यातील आलिशान सोसायटीत ड्रग्जचा कारखाना
'ड्रग्ज क्वीन' अश्विनी पॉलला ६ कोटींच्या मुद्देमालासह अटक
कल्याण, दि. २१ (मयुर धुमाळ) :- मुंबईतील गाजलेल्या नॅर्को ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर पोलिसांनी अमली पदार्थ माफियांविरोधात उघडलेली मोहीम आता अधिक तीव्र झाली असून, या कारवाईत पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या 'ड्रग्ज क्वीन' अश्विनी पॉलला पोलिसांनी अखेर टिटवाळा परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. तिच्या घरातून पोलिसांनी सुमारे ६ कोटी रुपये किमतीचे एमडी (MD) ड्रग्ज आणि मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही दिवसांपूर्वी अमली पदार्थ विरोधी विभागाने साकीनाका परिसरात कारवाई करून मोठ्या प्रमाणात ‘पॅरेंट्स’ नावाच्या ड्रग्ज गोळ्या जप्त केल्या होत्या. या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असताना पोलिसांना टिटवाळा येथील एका बड्या पुरवठादाराची माहिती मिळाली. तपासाची चक्रे फिरवत असताना पोलिसांचे लक्ष टिटवाळ्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या 'पद्मावती' सोसायटीकडे वळले. येथील फ्लॅट नंबर ७०५ मध्ये राहणारी ३५ वर्षीय अश्विनी पॉल ही महिला या संपूर्ण काळ्या धंद्याची मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. अश्विनी ही दिसायला सर्वसामान्य गृहिणी वाटत असली, तरी प्रत्यक्षात ती मुंबई आणि उपनगरातील अनेक हाय-प्रोफाईल ड्रग्ज पार्ट्यांना अमली पदार्थांचा पुरवठा करत होती.
अश्विनीने पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी अतिशय चपळाईने आपली यंत्रणा राबवली होती. ती केवळ ठराविक आणि विश्वासू लोकांमार्फतच व्यवहार करत असे, ज्यामुळे पोलिसांना तिच्यापर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. मात्र, साकीनाका प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींकडून मिळालेल्या 'टिप'मुळे पोलिसांनी या 'ड्रग्ज क्वीन'च्या घरावर पाळत ठेवली. खात्रीलायक माहिती मिळताच पोलिसांनी पद्मावती सोसायटीतील तिच्या घरावर धाड टाकली. या झडतीदरम्यान पोलिसांच्या हाती जे लागले ते पाहून अधिकारीही चक्रावून गेले. अश्विनीच्या घरातून तब्बल ५ हजार ड्रग्ज गोळ्या आणि ६ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी केवळ अश्विनीलाच नाही, तर तिला या व्यवसायात मदत करणाऱ्या सुफियान नावाच्या एका तरुणालाही अटक केली आहे. सुफियान हा ड्रग्जची वाहतूक आणि वितरणाची जबाबदारी सांभाळत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अश्विनी पॉलचा भूतकाळ तपासला असता, तिचे अनेक आंतरराज्यीय ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचे धागेदोरे पोलिसांना मिळत आहेत. टिटवाळ्यासारख्या शांत आणि विकसनशील भागात राहून तिने आपले हे साम्राज्य उभे केले होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत आणि हे ड्रग्ज नेमके कोठून येत होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. या मोठ्या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Comments
Post a Comment