रोहा एसटी स्थानक परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग!
आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
रोहा-रायगड (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील रोहा शहर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रोहा एसटी बस डेपोच्या परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणातील सविस्तर वृत्त असे की, पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित असूनही आरोपीने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. आरोपीने पीडितेशी जवळीक साधून तिला "चलो मेरे को रोहा घुमाओ" असे म्हणत रात्रीच्या वेळी सोबत फिरण्यास प्रवृत्त केले. पीडित मुलीला विश्वासात घेऊन आरोपीने तिला संपूर्ण रोहा शहर फिरवून आणले आणि त्यानंतर रात्रीच्या सुमारास तो तिला रोहा एसटी बस डेपोच्या परिसरात घेऊन आला.
बस डेपोच्या आवारात आल्यानंतर "आतमध्ये काय आहे ते पाहूया" असे सांगून आरोपीने पीडितेची दिशाभूल केली आणि तिला मुद्दामहून डेपोतील एका अंधाऱ्या व निर्जन जागेत नेले. त्या ठिकाणी कोणीही नसल्याचा फायदा घेत आरोपीने पीडित मुलीसोबत अत्यंत अश्लील कृत्य केले. या कृत्यामुळे पीडितेच्या स्त्री मनास मोठी लज्जा उत्पन्न झाली असून या प्रकारामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्याखाली आहे. या घटनेनंतर पीडितेच्या वतीने तत्काळ कायदेशीर पाऊले उचलण्यात आली.
या गंभीर घटनेची दखल घेत रोहा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ९२/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) मधील कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने सुरू केला आहे. रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. पायक यांच्याकडे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सोपवण्यात आला असून, आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Comments
Post a Comment