२३ लाखांची चोरी करणाऱ्या प्रेयसीसह प्रियकराला १२ तासांत उत्तर प्रदेशला पळण्याच्या तयारीत असताना अटक
पोयनाड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
अलिबाग-रायगड (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेने आपल्याच परिचिताच्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. मात्र, रायगड पोलिसांनी अत्यंत तप्तरतेने तपास चक्रे फिरवत या गुन्ह्याचा छडा अवघ्या १२ तासांच्या आत लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी महिला आणि तिला मदत करणाऱ्या तिच्या प्रियकराला नवी मुंबईतील तुर्भे परिसरातून अटक केली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला २३ लाख ५ हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी हे अलिबाग तालुक्यातील नवीन देहेन येथे एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहेत. रात्री दीड ते पहाटे सहा वाजेच्या सुमारास फिर्यादी आपल्या घरात झोपलेले असताना, त्यांच्या परिचयातील आरोपी राणी विनायक चव्हाण (रा. धानसर, तळोजा) ही तिथे आली होती. तिने फिर्यादी यांची कोणतीही पूर्वकल्पना न घेता, स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने कपाटातील १८.२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत १८,२०,०००/- रुपये), ४ लाख रुपयांची रोख रक्कम आणि ८५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन असा एकूण २३,०५,०००/- रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरी केल्यानंतर फिर्यादी झोपलेले असतानाच त्यांना बाहेरून खोलीत कोंडून आरोपी महिला तेथून पसार झाली होती.
याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके तात्काळ रवाना करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान अशी माहिती मिळाली की, मुख्य आरोपी राणी चव्हाण ही तिचा साथीदार शुभम जयसवाल याच्यासह उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नवी मुंबईतील तुर्भे येथे सापळा रचला आणि पळून जाण्यापूर्वीच राणी शुभम जयसवाल (२९ वर्षे) आणि शुभम पप्पु उर्फ पवनकुमार जयसवाल (२६ वर्षे) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान शुभम जयसवाल याचाही या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर दोघांनाही रीतसर अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेले सर्व सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा १०० टक्के मुद्देमाल जप्त केला आहे.
ही यशस्वी कामगिरी पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, सहाय्यक फौजदार नवनाथ म्हात्रे, पोलीस हवालदार सुरेश वाघमारे आणि मंगेश लांगी यांच्या पथकाने बजावली. गुन्हा दाखल झाल्यापासून अत्यंत कमी वेळात आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल रायगड पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment