पोलादपूर जवळ भीषण अपघात!
दुचाकी घसरून महालगुर येथील तरुणाचा मृत्यू
पोलादपूर-रायगड (प्रतिनिधी) :- मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर शहरानजीक असलेल्या मंगलमूर्ती अपार्टमेंटसमोर एक भीषण रस्ता अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण पडझडीत महालगुर येथील एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार महालगुर (ता. पोलादपूर) येथील रहिवासी असलेला आरोपीत हा आपल्या ताब्यातील होंडा कंपनीची स्कुटी (क्रमांक MH/06/CC/5660) घेऊन लोहारमाळ बाजूकडून मुंबई-गोवा हायवेने महालगुरच्या दिशेने प्रवास करत होता. सायंकाळची वेळ असल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ सुरू होती. मात्र, मौजे पोलादपूर गावच्या हद्दीत असलेल्या मंगलमूर्ती अपार्टमेंटसमोर ही दुचाकी आली असता, चालकाचा गाडीवरील ताबा पूर्णपणे सुटला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दुचाकीस्वार अत्यंत वेगाने आणि बेदरकारपणे वाहन चालवत होता. अपार्टमेंटसमोरील गोवा लेनवर अचानक नियंत्रण सुटल्याने दुचाकी महामार्गावरच जोरात स्लिप झाली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वार रस्त्यावर जोरात फेकला गेला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला, हाताला आणि पायाला अत्यंत गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, परंतु गंभीर दुखापत झाल्यामुळे या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात त्याच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. स्वत:च्याच अविचारी आणि हलगर्जीपणामुळे हा अपघात ओढवून घेतल्याने तो स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक २९/२०२६ नुसार मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम १८४, तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, १२५(a) आणि १२५(b) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवाल्दार श्री. परेश म्हात्रे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. महामार्गावर वाहन चालवताना वेगावर मर्यादा ठेवावी आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन या घटनेच्या निमित्ताने पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments
Post a Comment