वेगवान कारची रिक्षाला समोरासमोर धडकपेणच्या वाशी जवळील अपघातात रिक्षाचालकासह तिघे जखमी
पेण, दि. ३ (प्रतिनिधी) :- वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेण-वाशी रोडवर गुरुवारी सायंकाळी एका भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, रिक्षामधील अन्य दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात मौजे वाशी गावाच्या हद्दीत, काळेश्री रोडवरील वनस्पती देवी मंदिराच्या पुढे घडला. मुळचे काळेश्री येथील रहिवासी असलेले फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह रिक्षा क्रमांक (MH 04 HZ 2279) मधून वाशीच्या दिशेने जात होते. याच वेळी समोरून, म्हणजे वाशीकडून पेणच्या दिशेने येणाऱ्या टाटा कंपनीच्या कारने (MH 03 FD 1340) रिक्षाला समोरासमोर धडक दिली. कार चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपले वाहन भरधाव वेगात चालवल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
या धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, रिक्षाचालक प्रितम गजानन म्हात्रे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच रिक्षात बसलेले फिर्यादी आणि साक्षीदार आर्या पाटील हे देखील जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व छातीला मार लागला आहे. अपघातामध्ये रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणी जय हनुमान संस्थान, चेंबूर (मुंबई) येथील कार चालकाविरुद्ध वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडखळ पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार ठाकूर हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Comments
Post a Comment