जमीन विक्रीच्या बहाण्याने ५० लाखांची फसवणूक!
सुधागड तालुक्यातील गोंडाळे येथील धक्कादायक प्रकार
पाली-रायगड, दि. २२ (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील मौजे गोंडाळे येथे जमीन विक्रीच्या व्यवहारात एका व्यावसायिकाची ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, पनवेल येथील खारघर, सेक्टर ८ मधील रहिवासी असलेल्या फिर्यादी यांनी मौजे गोंडाळे येथील जमिनीचा व्यवहार केला होता. खारघरमधील वसुंधरा-२ को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीतील 'युगंधरा' इमारतीत राहणाऱ्या या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, हा संपूर्ण प्रकार १३ मे २०२२ ते २० एप्रिल २०२६ या प्रदीर्घ कालावधीत घडला आहे. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला गोंडाळे येथील गट क्रमांक ११२ मधील १.०८.०० हेक्टर आर आणि गट क्रमांक १५० मधील ०.४१.३० हेक्टर आर, अशी एकूण ३.७३ एकर जमीन विकण्याचे आमिष दाखवले होते.
सदर जमिनीच्या व्यवहारासाठी एकूण ५० लाख रुपये किंमत ठरवण्यात आली होती. फिर्यादीने जमिनीच्या मोबदल्यात ही संपूर्ण रक्कम वेळोवेळी आरोपींना अदा केली. मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतर आरोपींची नियत बदलली. व्यवहाराच्या अटींनुसार जमिनीची प्रत्यक्ष सरकारी मोजणी करून तिचा ताबा फिर्यादीला देणे आवश्यक होते, तसेच जमिनीवर काही ठराविक विकासकामे करून देण्याचे आश्वासनही आरोपींनी दिले होते. परंतु, चार वर्षांचा काळ उलटूनही आरोपींनी जमिनीचा ताबा दिला नाही आणि जमिनीवर कोणतेही विकासकाम केले नाही.
फिर्यादीने वारंवार पाठपुरावा करूनही आरोपींनी केवळ खोटी आश्वासने देऊन त्यांची दिशाभूल केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ४७/२०२६ नुसार दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलीस आता या व्यवहारातील आर्थिक धागेदोरे आणि इतर आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, व्यवहार करताना सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment