धुळ्यात बंदी असलेल्या पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांवर पोलीसांचा छापा
६१ हजारांचा माल जप्त
धुळे वृत्त (रणजीत मस्के) :- धुळे शहरात बंदी असलेल्या पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्यप्रसाधनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शहरात काही व्यापारी केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेल्या पाकिस्तानी वस्तूंची विक्री करत असल्याचे समोर आले होते. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली आणि शहरातील जय शंकर मार्केटमधील 'श्री साई ट्रेडर्स' व सार्वजनिक मार्केटमधील 'बिग बाजार' या दोन दुकानांवर अचानक छापे टाकण्यात आले.
या कारवाईदरम्यान 'श्री साई ट्रेडर्स'चे प्रोप्रायटर कैलास देवानंद नानकाणी यांच्याकडून ३०,०६३ रुपये किमतीची 'गोरी ब्युटी क्रीम' व 'चांदनी व्हाईटनिंग क्रीम' जप्त करण्यात आली, तर 'बिग बाजार'चे प्रोप्रायटर फजलूर रहेमान मोहम्मद सलीम अन्सारी यांच्याकडून ३१,४११ रुपये किमतीची 'डबल व्हाईट', 'फेस फ्रेश गोल्ड' आणि 'गोल्डन पर्ल' यांसारखी एकूण ६१,४७४ रुपयांची उत्पादने हस्तगत करण्यात आली. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवर कडक निर्बंध घातलेले असतानाही, या व्यापाऱ्यांनी कोणत्याही अधिकृत बिलाशिवाय आणि परवान्याशिवाय या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या.
या सौंदर्यप्रसाधनांमध्ये मानवी आरोग्यास अत्यंत घातक असणारी रसायने असण्याची दाट शक्यता असल्याने त्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यांविरुद्ध धुळे शहर आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात 'विदेश व्यापार (विकास व विनियमन) अधिनियम १९९२', 'भारतीय न्याय संहिता (BNS)' आणि 'औषधी व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४०' मधील विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईनंतर, नागरिकांनी अशा असुरक्षित आणि बनावट उत्पादनांचा वापर टाळून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासकडून करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment