मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 मुंबईत गुन्हा करून गोव्याच्या दिशेने पळणाऱ्या आरोपीला रायगड जिल्ह्यात अटक! गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि पोलादपूर पोलिसांची मुंबई-गोवा हायवेवर धाडसी कारवाई... 🚨

महाड-विन्हेरे मार्गावर भीषण अपघात! 
बेजबाबदार कार चालकाने दुचाकीला दिली समोरून धडक


​महाड-रायगड, दि. २३ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील महाड-विन्हेरे मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अर्टिगा कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घडली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून वाहनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ४:०० वाजण्याच्या सुमारास महाड-विन्हेरे रस्त्यावरून वाहतूक सुरू असताना कुर्ला गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. नागाव (ता. महाड) येथील रहिवासी असलेला आरोपी चालक आपल्या ताब्यातील 'मारुती सुझुकी अर्टिगा' (क्रमांक MH 14 JE 7020) ही कार घेऊन महाडकडून विन्हेरेच्या दिशेने जात होता. यावेळी रस्त्यावरील परिस्थितीचा आणि समोरून येणाऱ्या वाहनांचा कोणताही अंदाज न घेता, केवळ स्वतःच्या घाईपोटी त्याने वाहन अत्यंत निष्काळजीपणे आणि हयगयीने चालवले.

​त्याच वेळी समोरून, म्हणजेच विन्हेरे बाजूकडून महाडच्या दिशेने 'यमाहा फसिनो' ही दुचाकी (क्रमांक MH 12 MZ 6002) येत होती. कुर्ला गावच्या हद्दीत कार चालकाने आपल्या वाहनावरील नियंत्रण गमावल्याने त्याची थेट धडक समोरून येणाऱ्या या दुचाकीला बसली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला, ज्यामध्ये त्यांना शरीरावर लहान-मोठ्या गंभीर दुखापती झाल्या आहेत. अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रस्त्यावरील नागरिकांनी तत्काळ जखमीला मदतीचा हात दिला.

​या घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला असून, त्याच्या विरुद्ध महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४/२०२६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१ (रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालवणे), १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास सहाय्यक फौजदार देसाई हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. महाड-विन्हेरे मार्गावर वाढत्या वेगामुळे होणाऱ्या अपघातांबाबत स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून, वाहन चालकांनी संयमाने गाडी चालवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog