महाड एमआयडीसीत टँकरची पेवर मशीनला धडक अपघात करून चालक फरार
महाड, दि. २ (प्रतिनिधी) :- महाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसनपोई परिसरात एका बेजबाबदार टँकर चालकाने उभ्या असलेल्या पेवर मशीनला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ३१ मार्च २०२६ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून, अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवी मुंबईतील कळंबोली येथील 'राकेश रोडलाईन' (प्लॉट नं. ११, सेक्टर ८ ई) या कंपनीच्या मालकीचा टाटा कंपनीचा टँकर (क्रमांक NL 01 AH 3561) घेऊन चालक मौजे आसनपोई परिसरात आला होता. यावेळी टँकर चालकाने आपले वाहन अत्यंत वेगाने, हयगयीने आणि बेदरकारपणे रिव्हर्स (पाठीमागे) घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी नांगलवाडी, महाड येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी यांच्या मालकीचे पेवर मशीन तेथे उभे होते. चालकाचे आपल्या वाहनावर नियंत्रण न राहिल्याने त्याने टँकरचा मागील भाग पेवर मशीनला जोरात धडकावला.
ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये फिर्यादी यांच्या पेवर मशीनचे मोठे नुकसान झाले असून टँकरचेही नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, अपघात घडल्यानंतर रीतसर पोलिसांना माहिती देणे किंवा मदत करणे अपेक्षित असताना, संबंधित टँकर चालकाने कायद्याची तमा न बाळगता आपले वाहन घेऊन तिथून पळ काढला.
या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून महाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१ आणि ३२४(४) सह मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८४ आणि १३४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास पोलीस हवालदार पवार हे करीत असून, फरार टँकर चालकाचा शोध घेतला जात आहे.

Comments
Post a Comment