महाडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर मर्सडीजला वॅगनआरची जोरदार धडक!
निष्काळजीपणामुळे भीषण अपघात
महाड-रायगड (प्रतिनिधी) :- मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुपारी एक भीषण अपघाताची घटना घडली. टोळ फाटा येथील ब्रिजवर उभ्या असलेल्या एका लक्झरी मर्सडीज कारला भरधाव वेगाने येणाऱ्या वॅगनआर गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात मर्सडीजचा चालक जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात वॅगनआर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुंबई येथील लालबाग परिसरातील रहिवासी असलेले फिर्यादी (रा. रूम नं. १४०३, यशोमंगल, गोदरेज कंपाऊंड) हे त्यांच्या मर्सडीज कारने (क्र. एम.एच. ०१ ई.व्ही. ००९०) महामार्गावरून प्रवास करत होते. १५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी महाड तालुक्यातील मौजे टोळ फाटा येथील मुंबई-गोवा महामार्गावरील पुलावर आली असता, गाडीच्या खालच्या बाजूने काहीतरी विचित्र आवाज येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. तांत्रिक बिघाड असावा या शंकेने चालकाने प्रसंगावधान राखून गाडी पुलाच्या एका बाजूला सुरक्षित उभी केली. चालक गाडीखाली वाकून आवाजाचे नेमके कारण तपासत असतानाच हा अपघात घडला.
त्याच वेळी महाडकडून मुंबईच्या दिशेने जाणारा वॅगनआर कारचा (क्र. एम.एच. १२ के.जी. ०५७२) चालक आपल्या ताब्यातील वाहन अत्यंत बेदरकारपणे आणि अविचाराने चालवत तेथे पोहोचला. या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोर उभ्या असलेल्या मर्सडीज कारला पाठीमागून भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये मर्सडीज चालकाला लहान-मोठ्या गंभीर दुखापती झाल्या असून आलिशान मर्सडीज गाडीचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. भररस्त्यात झालेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच महाड तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी पेण तालुक्यातील मुंढाणी येथील रहिवासी असलेल्या वॅगनआर चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (ए), १२५ (बी) सह मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भरधाव वेग आणि निष्काळजीपणे वाहन चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका आरोपीवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार दडस हे करत आहेत. महामार्गावर वाहन थांबवताना किंवा तांत्रिक बिघाड तपासताना वाहनचालकांनी सुरक्षेचे नियम पाळावेत, असे आवाहन यानिमित्ताने पोलिसांनी केले आहे.

Comments
Post a Comment