एक्सप्रेसवेवर धावत्या ट्रकमधून चोरी करणारी टोळी गजाआड
खालापूर पोलिसांची मोठी कारवाई
खालापूर-रायगड, दि. २१ (प्रतिनिधी) :- मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर धावत्या वाहनातून मालाची चोरी करणाऱ्या एका सराईत टोळीचा खालापूर पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या कारवाईत चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्रगस्तीवर असलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या सतर्कतेमुळे ही मोठी कारवाई यशस्वी झाली असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, खालापूर पोलीस स्टेशनचे पथक एक्सप्रेस हायवेवर गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि सुरक्षेच्या कारणास्तव रात्रगस्त घालत होते. यावेळी एका 'इको' कारमध्ये चार इसम संशयास्पद रित्या फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मध्यरात्रीच्या सुमारास हायवेवर उभी असलेली ही कार आणि त्यातील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तातडीने गाडीची अडवणूक केली. पोलिसांनी गाडीची झडती घेण्यास सुरुवात केली असता, त्यांना गाडीच्या मागील भागात शिसे (Lead) धातूच्या जड प्लेट्स आढळून आल्या.
गाडीमध्ये असलेल्या प्रत्येकी २० किलो वजनाच्या अशा एकूण ३५ प्लेट्स पाहून पोलिसांचा संशय बळावला. प्राथमिक चौकशीत या इसमांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी आपला खाकी वर्दीचा हिसका दाखवत कसून चौकशी सुरू केल्यावर आरोपींनी आपले गुन्हे कबूल केले. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व साहित्य त्यांनी कळंबोली ते खालापूर टोल नाका या दरम्यान एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या मोठ्या मालवाहू वाहनांतून चोरले होते. धावत्या वाहनावर चढून किंवा वाहने थांबलेली असताना अत्यंत चालाखीने या प्लेट्स लंपास करण्यात आल्या होत्या.
पोलिसांनी या कारवाईत सुमारे ७०० किलो वजनाचा शिसे धातूचा साठा जप्त केला असून, गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली इको कार देखील ताब्यात घेतली आहे. या चारही आरोपींविरुद्ध खालापूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही टोळी अशा प्रकारच्या चोरीच्या इतर कोणत्या घटनांमध्ये सामील आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. हायवेवर प्रवाशांच्या आणि मालाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना, खालापूर पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Post a Comment