रत्नागिरीत 'मिशन फिनिक्स'चा धडाका!
मच्छीमार्केट परिसरातील केळीच्या वखारीवर छापा टाकून गांजा जप्त
रत्नागिरी पोलिसांची धडक कारवाई
रत्नागिरी, दि. २९ (प्रतिनिधी) :- रत्नागिरी शहराला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, 'मिशन फिनिक्स' अंतर्गत अवैध व प्रतिबंधित पदार्थांविरोधात विशेष मोहीम तीव्र करण्यात आली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मच्छीमार्केट परिसरातील केळीच्या वखारीवर धाड टाकून एका संशयित इसमास अमली पदार्थांसह रंगेहाथ पकडले. या धडक कारवाईमुळे शहरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मच्छीमार्केट परिसरातील केळीची वखार असलेल्या ठिकाणी अंमली पदार्थांची बेकायदेशीर खरेदी-विक्री आणि हालचाल सुरू असल्याची अत्यंत खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तात्काळ या परिसराची पाहणी केली आणि सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांना एका इसमाची हालचाल संशयास्पद आढळली. त्याची कसून झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून सुमारे १३६ ग्रॅम 'गांजा' हा प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. पोलिसांनी अंमली पदार्थासह संबंधित इसमास ताब्यात घेतले असून, त्याच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत सतर्कतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने हा छापा यशस्वी केला. रत्नागिरी जिल्ह्यातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून, नागरिकांनी देखील अशा प्रकारच्या अवैध कृत्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या टोळ्यांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला असून, आगामी काळातही ही मोहीम अधिक तीव्रतेने राबवण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

Comments
Post a Comment