मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

चारित्र्याचा संशय आणि आर्थिक पिळवणूक
पेणमध्ये विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल


पेण-रायगड, दि. ४ (प्रतिनिधी) :- चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणे, तसेच माहेरची मालमत्ता विकण्यासाठी दबाव टाकून आर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी पेण येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्कायव्हिला इमारतीत घडली असून, पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२५ ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत स्कायव्हिला येथील फ्लॅट क्रमांक ४०४ मध्ये हा प्रकार घडला. फिर्यादी महिला आणि तिचे पती, जे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पालवण सावर्डे येथील रहिवासी आहेत, ते सध्या पेणमध्ये वास्तव्यास आहेत. लग्न झाल्यापासूनच आरोपी पती फिर्यादी महिलेला मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि भावनिक अशा सर्वच स्तरांवर क्रूर वागणूक देऊन तिचा छळ करत होता.

​आरोपी पतीने पीडित महिलेच्या चारित्र्यावर वारंवार संशय व्यक्त करून तिला मानसिक त्रास दिला, तसेच अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. केवळ इतकेच नाही तर, फिर्यादीच्या आई-वडिलांच्या मालकीची जमीन विकल्यानंतर त्यातून मिळणारी सर्व रक्कम आपल्याकडे मागून घे, असा तगादा त्याने लावला होता. फिर्यादी महिला नोकरी करत असून त्यांचा संपूर्ण पगार आरोपी पती नियमितपणे काढून घेत असे. तसेच, त्याने पोलीस पतसंस्थेकडे खोटे कारण सांगून स्वतःच्या नावे कर्ज काढले आणि ते पैसे देखील गमावले आहेत.

​या सातत्यपूर्ण होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पेण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलीसांनी आरोपी पतीविरुद्ध पेण पोलीस ठाणे गु.र.नं. ५३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) आणि (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास महिला पोलीस हवालदार जाधव या करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक हिंसाचाराचा हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.


Comments

Popular posts from this blog