मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 मुंबईत गुन्हा करून गोव्याच्या दिशेने पळणाऱ्या आरोपीला रायगड जिल्ह्यात अटक! गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि पोलादपूर पोलिसांची मुंबई-गोवा हायवेवर धाडसी कारवाई... 🚨

रोहा तालुक्यातील मेढा बस स्टॉप परिसरात पैशांच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी
 परस्परविरोधी गुन्हे दाखल 


​रोहा (प्रतिनिधी) :- रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेढा बस स्टॉप परिसरात जुन्या आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी, ६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या राड्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी दिलेल्या तक्रारींनंतर रोहा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत रेवोली आदिवासीवाडी येथील फिर्यादी हे आपल्या पत्नी आणि मुलासह मोटार सायकल क्रमांक एम.एच.०६ सी.एस.८९४६ वरून नागोठणेच्या दिशेने जात होते. ते मेढा बस स्टॉप समोर पोहोचले असता, पूर्वी उसनवारीने घेतलेल्या पैशांच्या कारणावरून आरोपींनी त्यांना रस्त्यात गाठले. यावेळी झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर पुढे हिंसक हाणामारीत झाले. आरोपी क्रमांक २ याने फिर्यादी यांच्या पत्नीच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस आणि डोळ्यावर काठीने प्रहार केला, तर आरोपी क्रमांक १ याने तेथील दगड उचलून फिर्यादीच्या डाव्या हाताच्या कोपरावर जोराने मारून त्यांना गंभीर दुखापत केली. इतक्यावरच न थांबता, चारही आरोपींनी संगणमत करून फिर्यादी, त्यांची पत्नी आणि मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​दुसरीकडे, याच वेळी आणि याच ठिकाणी याच वादाच्या पार्श्वभूमीवर दुसरी घटना घडली. या घटनेतील फिर्यादी आणि त्यांची सून मेढा बस स्टॉप येथे आले असता, पैशांच्या व्यवहारावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. यावेळी चारही आरोपींनी संगणमत करून फिर्यादीच्या सुनेला आणि जावयाला लाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या वादादरम्यान आरोपी क्रमांक १ याने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यावर प्रहार करून त्यांना जखमी केले आणि परिसरात दहशत निर्माण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी घडलेल्या या दोन गंभीर प्रकारांमुळे रोहा पोलिसांनी या प्रकरणाची दखल गांभीर्याने घेतली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील सखोल तपास माननीय श्री. सुयश कुमार सिंह (परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक, भापोसे) हे स्वतः करत आहेत. पैशांच्या वादातून सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांविरुद्ध पोलीस आता काय कडक पावले उचलतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog