साळबा देवीच्या पालखी सोहळ्याहून परतताना वाद
लोखंडी रॉडने तरुणावर जीवघेणा हल्ला
रोहा-रायगड, दि. १६ (प्रतिनिधी) :- धार्मिक उत्सवाचा आनंद लुटून घरी परतत असताना झालेल्या क्षुल्लक वादाचे पर्यवसान एका गंभीर हाणामारीत झाल्याची घटना रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका तरुणाने आपल्याच गावातील व्यक्तीवर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रोहा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे घोसाळे येथील फिर्यादी, साक्षीदार आणि आरोपी हे सर्वजण अलिबाग तालुक्यातील साळाव येथे आयोजित करण्यात आलेल्या साळबा देवीच्या पालखी सोहळ्यासाठी गेले होते. दिवसभर उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यानंतर सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र, साळाव बस स्टॉप येथे पोहोचले असता, आरोपीने दारूच्या नशेत फिर्यादी आणि सोबत असलेल्या साक्षीदारांना विनाकारण अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपीचे वर्तन आटोक्याबाहेर गेल्याने आणि त्याचा त्रास वाढल्याने, फिर्यादीने त्याला चणेरा नाका येथे गाडीतून खाली उतरवून दिले.
आपल्याला गाडीतून खाली उतरवल्याचा तीव्र राग आरोपीच्या मनात होता. याच रागातून त्याने सुरुवातीला फिर्यादीला हाताने आणि बुक्क्यांनी मारहाण केली, तसेच झटापटी दरम्यान फिर्यादीच्या डाव्या कुशीत जोरात चावा घेतला. या प्रकारानंतर फिर्यादी आणि साक्षीदार आरोपीला तिथेच सोडून आपल्या घरी निघून गेले. मात्र, वाद तिथेच मिटला नाही.
दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास, जेव्हा फिर्यादी घोसाळे गावच्या तलावाजवळ उभे होते, तेव्हा आरोपीने पुन्हा एकदा तिथे येऊन जुन्या वादाचा काढत फिर्यादीवर हल्ला चढवला. आरोपीने हातात असलेल्या लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर मागील बाजूने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी होऊन कोसळले. घटनेची माहिती मिळताच फिर्यादीच्या घरच्यांनी धाव घेत त्यांना तातडीने उचलून उपचारासाठी नेले. मात्र, आरोपीचा संताप इतका होता की, त्याने फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही शिवीगाळ करत धमकावले.
या हिंसक घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९१/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१) (धोकादायक शस्त्राने दुखापत करणे), ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे) अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कांचन भोईर हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Comments
Post a Comment