मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

अहिल्यानगरमध्ये लाचखोर पोलीस हवालदाराला ३५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले


अहिल्यानगर, दि. १६ (प्रतिनिधी) :- एका कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि पोलीस ठाण्याचे हेलपाटे वाचवण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३५ हजार रुपये स्वीकारणाऱ्या तोफखाना पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून अटक केली आहे. अनिल अजिनाथ गोसावी (वय ४५, पोलीस हवालदार, ब. नं. १५३७) असे या कारवाईत पकडण्यात आलेल्या लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बाळासाहेब गिरी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. या तपासात त्यांना मदतनीस म्हणून अनिल गोसावी हे काम पाहत होते. तपासादरम्यान, गोसावी यांनी ११ एप्रिल २०२६ रोजी तक्रारदाराला त्यांच्या मोबाईलवर फोन करून तोफखाना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तेथे त्यांनी तक्रारदाराला सांगितले की, दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत हवी असेल आणि भविष्यात पोलीस ठाण्याचे वारंवार हेलपाटे टाळायचे असतील, तर तुम्हाला ५० हजार रुपये द्यावे लागतील.

​तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकाराबाबत नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेत विभागाने १५ एप्रिल २०२६ रोजी पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान, गोसावी यांनी सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी केली होती, मात्र चर्चेनंतर त्यांनी ३५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

​लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या माहितीच्या आधारे तोफखाना पोलीस ठाणे परिसरात सापळा लावला. ठ ठरल्याप्रमाणे, जेव्हा तक्रारदार ३५ हजार रुपयांची रक्कम घेऊन गोसावी यांच्याकडे गेले, तेव्हा गोसावी यांनी पंचांसमोर ही रक्कम स्वीकारली. रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ माजली असून गोसावी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

​ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. माधव रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक श्री. अजित त्रिपुटे यांचा समावेश होता, तर त्यांना पोलीस कर्मचारी संतोष शिंदे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड आणि हारूण शेख यांनी सहकार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू आल्हाट करत आहेत.

​लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, जर कोणत्याही शासकीय कार्यालयात कामासाठी किंवा लोकसेवकाकडून लाचेची मागणी केली जात असेल, तर तातडीने विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा, जेणेकरून भ्रष्टाचाराला आळा घालता येईल.

Comments

Popular posts from this blog