सामाजिक बांधिलकीचा नवा पायंडा; नगराध्यक्षांच्या आवाहनाला रोहेकरांचा ऐतिहासिक प्रतिसाद
उत्सवापेक्षा शिक्षण महत्त्वाचे! नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे यांचा स्तुत्य उपक्रम
रोहा (प्रतिनिधी) :- समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत आणि सार्वजनिक जीवनात वावरताना सामाजिक भान जपण्याचा आदर्श वस्तुपाठ रोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे यांनी समोर ठेवला आहे. आपला वाढदिवस अत्यंत विधायक आणि वेगळ्या पद्धतीने साजरा करताना त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने होणारी अवाढव्य बॅनरबाजी आणि पुष्पगुच्छांवर होणारा खर्च टाळून तोच खर्च समाजातील गरजू घटकांसाठी व्हावा, या हेतूने त्यांनी सर्व रोहेकर नागरिकांना यंदा बॅनर न लावण्याचे आणि पुष्पगुच्छांऐवीजी शालेय साहित्य भेट देण्याचे आवाहन केले होते. नगराध्यक्षांच्या या सकारात्मक आणि संवेदनशील आवाहनाला रोहेकर नागरिकांनी अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर वह्या, पेन, दप्तर आणि इतर शैक्षणिक साहित्याचा जमा झाले.
या सर्व शैक्षणिक साहित्याचे नियोजनबद्ध रितीने रोह्यातील विविध शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या विशेष मोहिमेअंतर्गत रोहा नगर परिषद शाळा क्रमांक १, ३, ४, ५, ६, ९, १० आणि डॉ. सी. डी. देशमुख माध्यमिक विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला. केवळ प्राथमिक आणि माध्यमिक शाळाच नव्हे, तर रोहा उर्दू शाळा, अष्टमी उर्दू शाळा यासह गोरोबानगर, सिद्धार्थनगर आणि नेहरूनगर येथील अंगणवाडीतील चिमुकल्यांनाही या मदतीचा हात देण्यात आला. शैक्षणिक साहित्यासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने रोहा तालुका मेडिकल असोसिएशनतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या फर्स्ट एड किटचेही यावेळी शाळांना वितरण करण्यात आले. या मदतीमुळे अनेक गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मोठी मदत झाली आहे.
साहित्याचे वाटप करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला निरागस आनंद हेच या उपक्रमाचे खरे यश असल्याचे समाधान नगराध्यक्षांनी यावेळी व्यक्त केले. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी केवळ सत्कार स्वीकारण्यापेक्षा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना मदत करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. या महत्त्वपूर्ण प्रसंगी नगराध्यक्षांसोबत सभापती महेश कोल्हटकर, नगरसेविका सौ. संजना शिंदे, सौ. नीता हजारे, फराह पानसरे, अफरीन रोगे तसेच सौ. समिधा अष्टीवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याव्यतिरिक्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेवराव साळवी, पायल शेडगे, दत्तात्रेय घरदाले, महेश शेडगे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्य साधून राबवण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत असून, राजकीय शक्तीप्रदर्शनापेक्षा सामाजिक कार्य श्रेष्ठ असल्याचा संदेश या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात पोहोचला आहे.

Comments
Post a Comment