मद्यधुंद तरुणाचा रात्री सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला!
उरण पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेऊन ठोकल्या बेड्या
उरण (विठ्ठल ममताबादे) :- उरणमधील द्रोणागिरी परिसरातील एका मजुराने त्याच्या सोबत राहणाऱ्या सहकाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सहकारी मजूर गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर उरण पोलिसांनी हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अरुण शामबाबू पांडे (२६) असे या हल्लेखोराचे नाव आहे.
या घटनेतील जखमी मजुराचे नाव कृष्णा रोटे प्रधान (२३) असे असून, तो उरण तालुक्यातील द्रोणागिरी येथील गामी कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी कामावर आहे. त्याच बिल्डिगच्या आवारातील पत्र्याच्या शेडमध्ये राहतो. १२ मार्च रोजी रात्री १२:३० सुमारास कृष्णा त्याच्या खोलीत झोपला होता. या वेळी अरुण नशेत त्याच्या खोलीत शिरला. त्यावर त्याने कृष्णाला झोपला नाही का? असे विचारले असता कृष्णा याने नशेत असलेल्या अरुण याला घरातून बाहेर जाण्यास सांगितले व त्याला खोलीपर्यंत सोडायला गेला. मात्र, या घटनेमुळे चिडलेल्या अरुण याने कोणताही विचार न करता त्याच्या कडील चाकूने कृष्णाच्या छातीवर वार केला. या हल्ल्यात कृष्णा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर उरण पोलिसांनी जखमी कृष्णा प्रधान याचा जबाब नोंदवून अरुण याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. उरण तालुक्यात विविध ठिकाणी इमारत बांधणीचे काम मोठया प्रमाणात सुरु असून परप्रांतीय कामगार मोठया प्रमाणात वास्तव्यास आहेत. मात्र कोणतेही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Comments
Post a Comment