पुण्यात खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई
दोन तरूणांकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
पुणे, दि. २१ मार्च (रणजीत मस्के) :- शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने आपली गस्त अधिक तीव्र केली असून, नुकत्याच मिळालेल्या एका गुप्त माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथक-२ ने बी. जे. एस. कॉलेज फाटा परिसरात मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलीसांनी सापळा रचून जेरबंद केले असून, त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहेत.
पुणे शहर गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक-२ चे पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या नेतृत्वाखालील पथक परिमंडळ ७ च्या परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस हवालदार कुसाळकर आणि पोलीस शिपाई गणेश खरात यांना त्यांच्या बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. तौसिफ शहा आणि सोमा चौधरी नावाचे दोन तरुण बी. जे. एस. कॉलेज फाटा येथे थांबले असून त्यांच्याकडे घातक अग्निशस्त्र असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला प्राप्त झाली. या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने त्या परिसरात धाव घेतली आणि सापळा लावला.
संबंधित ठिकाणी संशयास्पद रित्या थांबलेल्या दोन तरुणांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे तौसिफ शहा (वय २१ वर्ष, रा. नेहरू नगर, पिंपरी) आणि सोमा चौधरी (वय २१ वर्ष, रा. नेहरू नगर, पिंपरी) अशी सांगितली. पोलीसांनी त्यांची कसून अंगझडती घेतली असता, तौसिफ शहा याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस आढळून आली. ही हत्यारे पोलीसांनी तात्काळ जप्त केली असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या यशस्वी कामगिरीत पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्यासह पोलीस हवालदार कुसाळकर, पो. हवा. घावटे, पो. हवा. परीट, पो. हवा. आढारी, पो. हवा. येडे आणि पोलीस शिपाई खरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), भारतीय न्याय संहिता कलम ३(५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Comments
Post a Comment